सोसायटीत आढळलेल्या घोरपडीला जीवदान | पुढारी

सोसायटीत आढळलेल्या घोरपडीला जीवदान

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा :  येथील ग्रीन ऑलिव्ह या सोसायटी आवारात भरकटलेल्या लांबलचक घोरपडीला रहिवाशांनी हुसकण्याच्या प्रयत्न केला. मात्र, भेदरेलली ती घोरपड पार्किंगमधील मोटारीच्या इंजिनमध्ये दबा धरून बसली. अखेर प्राणीमित्रांनी तब्बल तीन तास अथक प्रयत्नांनी त्या घोरपडीला पकडून सुखरूप जंगलात सोडले. वाईल्ड अँनिमल्स अँन्ड स्नेक्स् प्रोटेक्शन सोसायटी संस्थेचे स्वयंसेवक किरण जांभुळकर यांना फोनवरून माहिती मिळाली की, सोसायटीत घोरपड सदृश प्राणी आला असून तो प्राणी मोटारीत जाऊन बसला आहे. किरण जांभुळकर यांच्यासह गणेश भुतकर, शेखर जांभुळकर आणि तुषार पवार यांनी शोध अभियान सुरू केले. मोटर मेकॅनिकच्या चार तासांच्या अथक परिश्रमानंतर तिला बाहेर काढण्यात यश आले. पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण आणि वनरक्षक पांडुरंग कोपनर यांना घटनेची माहिती देऊन सुमारे दीड किलो वजनी ती घोरपड जंगलात सुखरूप सोडण्यात आली.

घोरपडीचे मांस औषधी असून ते सेवन करणे हा सांधेदुखीवर रामबाण उपाय असल्याचा समज नागरिकांत आहे. त्यामुळे घोरपडीला खूप मागणी आहे. ही घोरपड जर चुकीच्या हातात गेली तर नक्कीच ती खाद्य झाली असती याचे गांभीर्य सोसायटी रहिवाशांनी ओळखून त्यांनी प्राणीमित्रांना पाचारण करून तिला जीवदान दिले. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कुठेही कोणताही साप, वन्यजीव प्राणी आढळल्यास किंवा तो अडचणीत असल्यास आनंद अडसुळ (पुणे) 9860181534, गणेश भूतकर (पिंपरी चिंचवड) 9970668886 यांना संपर्क साधण्याचे आवाहन वाईल्ड अ‍ॅनिमल्स अ‍ॅन्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी या संस्थेने केले आहे.

Back to top button