चाकण : कांद्याला प्रतिक्विंटलला 3 हजारांचा दर; दरात येत्या काळात वाढीची शक्यता | पुढारी

चाकण : कांद्याला प्रतिक्विंटलला 3 हजारांचा दर; दरात येत्या काळात वाढीची शक्यता

चाकण; पुढारी वृत्तसेवा: कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. चाकण येथील घाऊक बाजारात सध्या कांद्याच्या बाजारभावात वाढ होत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी (दि. 2) कांद्याची 2 हजार 500 क्विंटल आवक होऊन कांद्याला 1500 ते 3 हजार रुपये दर मिळाला असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मागील काही दिवसांपासून कांद्याला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल ते 3 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा सर्वसाधारण बाजार भाव मिळत आहे. यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव उमटत आहेत. शिवाय आगामी काळात कांद्याची उपलब्धता आणि कांद्याची मागणी याचा विचार केल्यास कांद्याच्या बाजारभावात अजूनच वाढ होण्याची शक्यता जाणकार मंडळींनी वर्तवली आहे.

कांदा लवकरच 60 रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊ शकतो, असा काही व्यापार्‍यांचा अंदाज आहे. यंदा कांदा पिकाला हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. कांदा उत्पादक राज्य कर्नाटकमध्ये काढणीसाठी आलेल्या कांदा पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात बाजारात कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे. बाजारात कांद्याची आवक कमी राहून बाजारभावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बटाट्याच्या दरातही वाढ
चाकण मार्केटमध्ये बुधवारी (दि. 2) बटाट्याची 4 हजार क्विंटल आवक झाली. जुन्या बटाट्याला 1800 ते 2800 रुपये दर मिळाला; तर नवीन गावरान बटाट्याला 1800 ते 2200 रुपये दर मिळाल्याचे खेड बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान चाकणमध्ये सध्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावरान बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून देशातील अन्य राज्यांमध्ये या बटाट्याला मोठी मागणी असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

Back to top button