पिंपरी : दस्त नोंदणी कार्यालयांची कोटींची उड्डाणे ; दसरा ते दिवाळीदरम्यान महसुलात मोठी वाढ | पुढारी

पिंपरी : दस्त नोंदणी कार्यालयांची कोटींची उड्डाणे ; दसरा ते दिवाळीदरम्यान महसुलात मोठी वाढ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील सह-दुय्यम निबंधक कार्यालयांना दसरा ते दिवाळी या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत कार्यालयनिहाय सरासरी 5 ते 9 कोटी रुपयांची उत्पन्नवाढ झाली आहे. कार्यालयांमध्ये होणार्‍या दस्त नोंदणीत जवळपास 70 टक्के प्रमाण हे सद्निकांच्या करारनाम्यांचे असून, त्यातून अधिक महसूल मिळाला आहे.

ऑक्टोबरमध्ये सदनिका करारनामे वाढले
दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त पाहून घरखरेदी करण्याकडे बर्‍याच जणांचा कल असतो. यंदा दसरा आणि दिवाळी ऑक्टोबर महिन्यातच आले. दसरा 5 ऑक्टोबरला तर, लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबरला होते. त्यामुळे यंदा या महिन्यात सह-दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी विशेषतः सदनिकांच्या करारनाम्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. पिंपरी येथील सह-दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक 18 येथे ऑक्टोबर महिन्यात दररोज सरासरी 30 ते 40 दस्तांची नोंदणी झाली. त्यामध्ये 25 ते 30 दस्त हे सदनिकांच्या करारनाम्याचे होते. सह-दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक 26 येथे याच महिन्यात दररोज सरासरी 40 ते 45 दस्तांची नोंदणी होत होती. त्यापैकी 20 ते 25 दस्त हे सदनिका करारनाम्यांचे होते.

हवेली क्रमांक 18 च्या कार्यालयाला 30 कोटींचे उत्पन्न
पिंपरीतील हवेली क्रमांक 18 च्या कार्यालयात ऑक्टोबर महिन्यात 863 दस्त नोंदविले गेले. कार्यालयाला नोंदणी आणि मुद्रांक शुल्कातून 30 कोटी 54 लाख 64 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात 940 दस्तांची नोंदणी होऊनही 21 कोटी 24 लाख रुपयांचेच उत्पन्न कार्यालयाला मिळाले होते. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत 9 कोटी 30 लाख रुपयांनी उत्पन्न वाढले आहे, अशी माहिती सह-दुय्यम निबंधक राजेश काळपांडे यांनी दिली.

हवेली क्रमांक 26 ला 23 कोटींचे उत्पन्न
पिंपरीतील सह-दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 26 मध्ये गेल्या ऑक्टोबर महिन्यात 935 दस्तांची नोंदणी झाली. मुद्रांक आणि नोंदणी शुल्कातून कार्यालयाला 23 कोटी 32 लाख 81 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी याच महिन्यात 836 दस्तांचीच नोंदणी झाली होती. त्या तुलनेत यंदा 99 दस्त वाढले आहेत. तसेच, 5 कोटी 11 लाख 65 हजार रुपयांनी उत्पन्न वाढ झाली आहे. गतवर्षी 18 कोटी 21 लाख रुपयांचेच उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती सह-दुय्यम निबंधक सविता बुरसे यांनी दिली.

Back to top button