माळेगाव येथे अवैध धंद्यांविरोधात एल्गार; महिला व सामाजिक कार्यकर्ते आक्रमक | पुढारी

माळेगाव येथे अवैध धंद्यांविरोधात एल्गार; महिला व सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

माळेगाव बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : येथे विषारी ताडी पिल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या महिला व ग्रामस्थांनी बुधवारी (दि. 2) विषारी ताडी विक्री करणार्‍या व अवैध दारू धंद्यांविरोधात मोर्चा काढून एल्गार पुकारला. या वेळी या अवैध दारूधंद्यांना पाठीशी घालण्यार्‍या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. अवैध दारू व्यावसायिकांवर पोलिसांनी कडक कारवाई यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दि. 30 ऑक्टोबर रोजी माळेगाव चंदननगर भागातील राजू लक्ष्मण गायकवाड व हनुमंत मारुती गायकवाड या दोन युवकांचा विषारी ताडी पिल्याने मृत्यू झाला होता. त्याचे पडसाद बुधवारी माळेगाव परिसरात उमटले. महिला, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकत्र्यांनी एकत्रित येत अवैध विषारी ताडी विक्री व राजरोसपणे हातभट्टी दारू गाळून विक्री करणार्‍या व्यावसायिकांविरोधात माळेगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. या वेळी दारूबंदी झाली पाहिजे, युवकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विषारी ताडी विक्रेत्यावर मोक्काची कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा देत हा मोर्चा गावातून निरा-बारामती रस्त्याने माळेगाव पोलिस ठाण्यावर पोहचला. त्याचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात ठोस भूमिका न घेतल्याने त्यांना ऊत आला आहे. त्यामुळे अनेक युवक मृत्युमुखी पडू लागले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. धंद्याविरोधात ठोस निर्णय घेतला नाही तर जनआंदोलन लढा तीव— केला जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे, विक्रम कोकरे, आवुराजे भोसले, अशोक सस्ते, उदय चावरे, रामभाऊ वाघमोडे, विश्वास मांढरे, प्रशांत वाघमोडे, कल्पना माने, अंजू वाघमारे, आशा नवले यांनी दिला. मोर्चेकर्‍यांनी दिलेल्या निवेदनाचा स्वीकार तालुका पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी केला. तसेच जय लहुजी वस्ताद दहिहंडी संघ व जय लहुजी सेनेचे पदाधिकारी कैलास दादा सकट, सागर खंडागळे यांच्या कार्यकत्र्यांनी अवैध धंद्याविरोधात वेगळे निवेदन दिले. या वेळी माळेगावचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करणार आहे. चोरून धंदे करणार्‍यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. त्यासाठी नागरिकांनी पंच म्हणून पुढे आले पाहिजे.

                                             – किरण अवचर, पोलिस निरीक्षक

Back to top button