सेंट्रिंग प्लेट चोरून विकणारी टोळी गजाआड; पौड पोलिसांची कामगिरी | पुढारी

सेंट्रिंग प्लेट चोरून विकणारी टोळी गजाआड; पौड पोलिसांची कामगिरी

पिरंगुट; पुढारी वृत्तसेवा: भूगाव भुकूम परिसरातील बांधकामाच्या सेंट्रिंग प्लेट चोरून विकणारी टोळी पौड पोलिसांनी गजाआड केली आहे. आरोपींकडून चोरीत वापरलेल्या टेम्पोसह सुमारे 2,40,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. परिसरामधून किरण शाम नवाळे (वय 27), सूरज दत्तात्रेय ननावरे (वय 26, दोघेही रा. साक्षी अपार्टमेंट, फ्लॅट नं 505, भुकूम, ता. मुळशी), जयेश मोहन सागरे (वय 27, चाळ नंबर 9, मोरे महाविद्यालय जवळ, कोथरूड-4), स्वप्नील शंकर भोंगळे (वय 25, रा. चाळ नंबर- 6, मोरे विद्यालयाजवळ कोथरूड पुणे) या चौघांनी रात्रीच्या वेळी ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत.

त्या ठिकाणहून सेंट्रिंग प्लेट चोरून त्या पिंपरी-चिंचवड हद्दीतील दापोडी परिसरातील मोसिम सुलतान खान (रा. दापोडी) याला विकल्या होत्या. गुन्ह्यातील चोरलेल्या सेंट्रिंग प्लेट, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेला टेम्पो असा एकूण 2,40,000/- रुपयांचा मुद्देमाल पौड पोलिसांनी जप्त केला असून, सर्व आरोपींनाही अटक केली आहे. याबाबत कोथरूड येथील बांधकाम व्यावसायिक तुकाराम दिघे यांनी पौड पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.

उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिता रवळेकर, पोलीस नाईक सिद्धेश पाटील, पोलीस शिपाई अक्षय नलावडे, पोलीस हवालदार हरिश्चंद्रे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

अनधिकृत बांधकामात निवास
चोरीच्या गुन्ह्यामध्ये पकडलेले दोघे आरोपी हे अनधिकृत बांधकामांमध्ये राहत आहेत. अनधिकृत बांधकामे या चोरांचे अड्डे होत आहेत, हेच पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे.

Back to top button