तळेगावात प्रलंबित कामे तातडीने होणे आवश्यक | पुढारी

तळेगावात प्रलंबित कामे तातडीने होणे आवश्यक

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे शहर पुणे-मुंबई महामार्गावर असून सभोवताली मोठया प्रमाणात औद्योगिकरण झालेले आहे, शहरात वैद्यकीय,शैक्षणिक सुखसोयी अद्यावत असल्यामुळे दळण वळण वाढलेले आहे आणि लोकसंख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झालेली आहे. परंतु त्या मानाने नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा अभाव दिसून येत असुन अनेक कामे प्रलंबित आहेत. तळेगाव येथे आणि परिसरात रस्ते डांबरीकरण,लहान मोठे खड्डे बुजविणे,उघड्या गटारी बुजविणे ही कामे तसेच डीपीरोड आदी ठिकाणी उघडी रिकामी पाईप लाईन बुजविणे, सिटी बस थांब्यास शेड उभारणे आदी कामे प्रलंबित असुन अनेक कामे रखडली आहेत. आता कोरोना आटोक्यात आलेला आहे, पावसानेही निरोप घेतला आहे, दिवाळीही झालेली आहे.

आता प्रलंबित कामे करण्याबाबत अडचणी येणार नसल्यामुळे प्रशासनाने प्रलंबित कामे सुरु करुन कामाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. हिंदमाता भुयारी मार्ग,वीज कार्यालयांकडे जाण्याचा मार्ग आदी ठिकाणी डांबरीकरणाचे काम सुरु होवून रखडले आहे अनेक वेळा प्रशासनाचे निदर्शनास आणून देखील ही कामे का रखडली समजत नाही. तळेगाव शहरात स्टेशन भागात उपनगरामध्ये तसेच तळेगाव-चाकण महामार्गावर जीवघेणे धोकादायक खड्डे आहेत काही खड्डे रस्त्याच्या कडेला उपनगरात असुन धोकादायक आहे. ते तात्पुरते न बुजवता कायमस्वरुपी बुजविले पाहिजेत. तसेच शहरात एकुण पुणे,वडगाव,आणि चाकणच्या दिशेने जाणा-या आणि येणा-या मार्गावर सीटीबसचे सुमारे २५ बस थांबे असून बहुतांशी थांबे उघड्यावर आहेत.

यामुळे प्रवाशांना उन,पाऊस,थंडीस तोंड द्यावे लागत आहे तरी शेड उभारण्याचे काम होणे आवश्यक आहे.आवश्यक तेथे स्पीड ब्रेकरचे काम होणे आवश्यक आहे. सध्या नागरिकांशी संबंधित विकास कामे करण्यास अनुकूल परिस्थिती आहे बघता बघता हे वातावरण जाऊन पावसाळा आलेलाही कळणार नाही आणि परत ही कामे रखडणार आहेत आणि पावसाळ्याचे निमित्त मिळणार आहे. तरी प्रशासनाने डांबरीकरण,खड्डे बुजविणे,सीटीबस थांब्यासाठी शेड उभारणे,स्पीड ब्रेकर आदी कामे जलदगतीने केली पाहीजेत आशी नागरिकांची मागणी आहे. याबाबत राजकीय ,सामाजिक कार्यकर्त्यांनीही लक्ष देवून न झालेली, रखडलेली कामे प्रशासनाच्या निदर्शनास आणली पाहिजेत.

 

Back to top button