राहू बेट भागात उसावर आता लोकरी मावा | पुढारी

राहू बेट भागात उसावर आता लोकरी मावा

राहू; पुढारी वृत्तसेवा: परतीच्या पावसाचा शेतीला फटका बसल्यानंतर आता पुन्हा एकदा लोकरी माव्याने शेतकर्‍यांच्या ऊस पिकावर आक्रमण केले आहे. राहू परिसरातील अनेकांच्या उसावर लोकरी मावा झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. राहू बेट परिसरात पावसाळी वातावरण तर लगेचच ढगाळ व थंड वातावरणामुळे उसाच्या पिकावर लोकरी माव्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी शेतकरीवर्गाने औषध फवारणीवर विशेष भर दिल्याचे परिसरात एकंदरीत चित्र पहायला मिळते आहे.

राहू बेट परिसरातील शेतकर्‍यांचे ऊस मुख्य पीक असून शेतकरी आडसाली तसेच बिगर हंगामी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पडलेल्या पावसामुळे परिसरातील ओढ्यांनादेखील मोठ्या प्रमाणात पाणी येऊन पूरस्थिती निर्माण झाली होती.

त्यातच दोन ते तीन दिवस ढगाळ हवामान असल्यामुळे आणि पाऊस जास्त झाल्याने उसाचा पिकाला हिरवाई आली. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकरी मावा झडला आहे. लोकरी माव्याने अनेक ठिकाणी उसाची पाने पांढरी पडलेली दिसत आहे. अनेक ठिकाणी शेतकरी लोकरी मावा आटोक्यात आणण्यासाठी रासायनिक औषधांची फवारणी करत आहे. लोकरी मावा उसाबरोबरच इतरही पिकावर होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. लोकरी माव्याचा उसावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात थोडीफार घट येण्याची शक्यता अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button