रिंगरोड बदलणार पुण्याची ‘जीवनरेषा’; औद्योगिकीकरणाला मिळणार गती

रिंगरोड बदलणार पुण्याची ‘जीवनरेषा’; औद्योगिकीकरणाला मिळणार गती
Published on
Updated on

दिगंबर दराडे
पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार्‍या रिंगरोडच्या कामाने आता गती घेतली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सतत पाठपुरावा करीत आहेत. या रिंगरोडभोवती वेगवेगळे प्रकल्प उभे करण्यात येणार असल्याने शहराची जीवनरेषा बदलण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

रिंगरोड करताना अनेक भव्यदिव्य व पुणे जिल्ह्याचा चेहरामोहराच बदलवणारे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. याचा एक भाग म्हणजे खडकवासला धरणावर मालखेड ते वडदरे यादरम्यान वांद्रे-वरळी सी-लिंक यासारखा 800 मीटरचा ब्रिज बांधण्यात येणार आहे. यामुळे खडकवासला व लगतच्या परिसरात पर्यटनवाढीस प्रचंड वाव मिळण्यास मदत होणार आहे.

वांद्रे-वरळी सागरी मार्ग हा मुंबई शहरामधील एक महत्त्वाचा रस्ता आहे. हा पूल देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केला आहे. यासाठी तब्बल 1600 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. याच धर्तीवर पुण्यात देखील एमएसआरडीसीच्या वतीने खडकवासला धरणावर सी-लिंकसारखा ब्रिज बांधण्यात येणार आहे. सध्या या रिंगरोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, मोजणी पूर्ण होऊन जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवीन वर्षात रिंगरोडच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे.

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा रिंगरोड खर्‍या अर्थाने नावीन्यपूर्ण ठरणार आहे. या रिंगरोडचा एक भाग म्हणून खडकवासला धरणावर मालखेड गाव ते वडदरे गाव यादरम्यान सुमारे 800 मीटरचा हा ब्रिज बांधण्यात येणार आहे. रिंगरोडवर एकूण चार मोठे बि—ज बांधण्यात येणार असून, यापैकी या सी-लिंकसारख्या ब्रिजचा समावेश आहे.

…असा होणार रिंगरोड
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांभोवती पूर्व आणि पश्चिम भागात रिंगरोड होणार आहे. पूर्व भागात 103 किलोमीटर लांबीचा रिंगरोड असून, तो 46 गावांमधून जातो. पश्चिम भागाचा 68.3 किलोमीटर लांबीचा रिंगरोड असून, तो 37 गावांमधून जातो. एकूण 172 किलोमीटर लांबीचा रिंगरोड मावळ, मुळशी, हवेली, भोर, पुरंदर या पाच तालुक्यांमधील 81 गावांमधून जातो. या रिंगरोडसाठी 1585.47 हेक्टर जमीन संपादित करायची असून, त्यासाठी 4963.59 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तर, एकूण बांधकामासाठी 17,723.63 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

रिंगरोडमुळे पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पुण्याचा रिंगरोड हा देशात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करणारा ठरेल. या रिंगरोडचा फायदा संपूर्ण राज्याला होणार आहे. रिंगरोडची मोजणी पूर्ण झालेली असून, लवकरात लवकर या रिंगरोडचा मोबदला शेतकर्‍यांना देण्यात येईल. या रिंगरोडमुळे शहराची अर्थव्यवस्था बदलण्यास मदत होईल.
                                                         -डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

..अर्थव्यवस्था बळकट होईल
रिंगरोडमुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. निश्चितपणे वाहतुकीचा दबाव कमी होणार आहे. या रोडच्या भोवती टीपी स्कीममुळे विकासाला चालना मिळेल. टीपी स्कीममुळे रिंगरोडच्या आजूबाजूला लोकांना फायदा होईल.

– राहुल महिवाल, पीएमआरडीए आयुक्त

उद्योग भरारी घेतील
पुणे शहराच्या दृष्टिकोनातून रिंगरोड अतिशय महत्त्वाचा आहे. या रिंगरोडमुळे निश्चितपणे पुणे शहराच्या उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे. सातारा, सोलापूर, नगर, बंगळुरूवरून येणारी वाहतूक बाहेरूनच गेल्याने शहरातील मालवाहतूक देखील गतिमान होईल .

                                                                  – जयंत शहा, उद्योजक

मुंबईच्या पर्यटनात भर घालणार्‍या वांद्रे-वरळी सी-लिंकसारखा ब्रिज आता पुण्यात देखील होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) रिंगरोडवर खडकवासला धरणावर मालखेड ते वडदरे यादरम्यान सुमारे एक किलो मीटरचा सी-लिंकसारखा ब्रिज बांधण्यात येणार आहे. यामुळे पुण्याच्या पर्यटनात देखील भर पडणार आहे. जगात पर्यटनात अग्रेसर असलेल्या देशाची प्रगती होत असल्याचे पाहायला मिळते.

                                              – अतुल गोयल, बांधकाम व्यावसायिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news