पुणे : खरीप हंगामात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा

शिवाजी शिंदे
पुणे : राज्यात खरीप हंगामात 1 कोटी 41 लाख 97 हजार हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी सर्वाधिक 31 लाख 23 हजार 624 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतले असल्याचे ई-पीक पाहणी नोंदणीतून पुढे आले आहे. दरम्यान, या पिकाच्या खालोखाल कापूस 14 लाख 89 हजार 847 हेक्टर, भात 7 लाख 97 हजार 776 हेक्टर, तूर 3 लाख 21 हजार ,720 हेक्टर, तर मका 2 लाख 84 हजार 653 हेक्टर क्षेत्राची ई- पीक पाहणी नोंदणी अॅपवर नोंद झाली आहे.
राज्यात खरीप हंगामातील पिकांची नोंद ई-पीक पाहणी अॅपमध्ये करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने शेतकर्यांना आवाहन केले होते. त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून खरीप हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी अॅपवर नोंदणी करण्यास सुरुवात झाली. अर्थात, या विभागाने मागील दोन वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामात राज्यातील शेतकरी शेतीमध्ये कोणकोणती पिके घेतात, याची नोंद करण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार ई-पीक पाहणी अॅप विकसित करण्यात येऊन त्या माध्यमातून शेतकर्यांना डायरेक्ट ई-पीक पाहणी अॅप उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे शेतकर्यांना सहजपणे पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी अॅप करता येऊ लागली. खरीप हंगामात राज्यात सोयाबीन या पिकाची इतर पिकांपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड शेतकर्यांनी केली आहे. हे पीक हमखास जोरदार रक्कम देणारी आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी या पिकाची पेरणी करीत आहेत. या पिकानंतर कापूस, धातू, मका, तूर या पिकांची लागवड करण्यावर शेतकरी भर देत असल्याचे ई-पीक पाहणी अॅपवरून दिसून आले आहे.
ई पीक पाहणी : खरीप हंगाम 2022 मध्ये शेतकरी स्तरावरील पीक पाहणी 23 ऑक्टोरपर्यंत मुदत पूर्ण झाली असून, खरीप हंगाम पिकांची नोंद मोबाइलमधून करता येणार नाही. मात्र, खरीप हंगाम पिकांची नोंद तलाठीस्तरावरून 15 नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे. तथापि, संपूर्ण वर्ष म्हणजेच बहुवार्षिक पिकांची नोंद शेतकरीबंधूंना मोबाइल अॅपमधून करता येणार आहे.
श्रीरंग तांबे, समन्वयक, ई-पीक पाहणी अॅप