पुणे : ‘मल्टिलेव्हल पार्किंग’ आठवडाभरात; विमानतळावर इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेची अंतिम चाचणी सुरू | पुढारी

पुणे : ‘मल्टिलेव्हल पार्किंग’ आठवडाभरात; विमानतळावर इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेची अंतिम चाचणी सुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे विमानतळावरील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात येणारे ‘मल्टिलेव्हल पार्किंग’ येत्या आठवडाभरातच सुरू होणार आहे. त्याची सर्व कामे पूर्ण झाली असून, इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेची अंतिम चाचणी सुरू आहे. पुणे विमानतळावर गेल्या अनेक दिवसांपासून चारचाकी आणि दुचाकी वाहने पार्किंग करण्याची समस्या भेडसावत होती.

त्या पार्श्वभूमीवर थेट विमानतळाशी कनेक्टेड (जोडणारी) मल्टिलेव्हल पार्किंग उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या परिसरात उद्भवणारी पार्किंगची समस्या आता लवकरच संपणार आहे. हे मल्टिलेव्हल पार्किंगचे काम पूर्ण करून ही सुविधा एप्रिल 2022 पर्यंत सुरू करण्यात येणार होती. कोरोनामुळे हे काम लांबले होते. त्यानंतर हे काम सप्टेंबर 2022 या महिन्यात खुले करण्यात येणार होते. त्यानंतरही या कामाला दोन महिने विलंब झाला असून, आता ते चालू महिन्यात सुरू होणार आहे.

पार्किंगचा व्यावसायिक वापर
चार मजली असलेल्या या ‘मल्टिलेव्हल पार्किंग’चा वापर विमानतळ प्रशासन व्यावसायिक तत्त्वावर देखील करणार आहे. प्रत्येक मजल्यावरील पार्किंगसोबत येथे फूड स्टॉल आणि काही खासगी कार्यालयेसुध्दा असणार आहेत. त्यामुळे विमानतळ प्रशासनाला या पार्किंगमधून मोठा महसूल मिळणार आहे.

दर शासन ठरविणार…
विमानतळ प्रशासनाकडून उभारण्यात येणार्‍या पार्किंगचे काम आता पूर्ण होत आहे. या चार मजली असलेल्या हायटेक पार्किंगमध्ये ओला, उबेर गाड्यांचेही पार्किंग असणार आहे. थेट येथूनच प्रवाशांना टॅक्सी बुक करता येईल. त्यासोबतच या पार्किंगमध्ये तासाच्या दरानुसार प्रवाशांना आपल्या दुचाकी, चारचाकी येथे पार्क करता येतील. त्याचे दर शासनाने ठरविलेले असतील, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

ऑनलाइन बुक करता येणार पार्किंग
चित्रपटाच्या तिकिटाप्रमाणेच प्रवाशांना मोबाईलवरूनसुध्दा पार्किंग बुक करता येणार आहे. त्याकरिता निश्चित करण्यात आलेले शुल्क प्रवाशांना ऑनलाईन गुगल पे, फोन पे, पेटीएमद्वारे सुध्दा देता येणार आहे.
विमानतळाला जोडणार्‍या फूट ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण
मल्टिलेव्हल पार्किंगमधून थेट विमानतळाला जोडणार्‍या फूट ओव्हर ब्रिजचे काम देखील पूर्ण करण्यात आले आहे. या मल्टिलेव्हल पार्किंगवरील ब्रिजच्या माध्यमातून प्रवाशांना थेट विमानतळावर जाता येणार आहे.

प्रवाशांना विमानतळावर येणारी पार्किंगची अडचण सोडविण्यासाठी आम्ही ‘मल्टिलेव्हल पार्किंग’ उभारण्याचे काम हाती घेतले होते. ते आता पूर्ण झाले आहे. फक्त इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेची अंतिम चाचणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर लवकरच हे पार्किंग खुले करण्यात येईल.
                                               – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

अशी आहे स्थिती
विमानतळावरील
रोजची उड्डाणे –
80 ते 85
विमानतळावरील
रोजची प्रवासीसंख्या –
23 ते 25 हजार
मल्टिलेव्हल
पार्किंगची क्षमता –
1 हजार दुचाकी
1 हजार चारचाकी

Back to top button