पुणे: कोथिंबीर कडाडली, शेकड्याला चार हजार बाजारभाव | पुढारी

पुणे: कोथिंबीर कडाडली, शेकड्याला चार हजार बाजारभाव

पारगाव, पुढारी वृत्तसेवा: कोथिंबिरीचे बाजारभाव वाढल्याने आता व्यापारी थेट शेतात जाऊन कोथिंबीर खरेदी करू लागले आहेत. सध्या कोथिंबिरीला शेकड्याला चार हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे.

यंदा अतिपावसाचा फटका सर्वच पालेभाज्यांना बसल्याने पालेभाज्या सध्या शेतात शिल्लक नाहीत. बाजारपेठांमध्ये कोथिंबिरीची कमतरता झाल्याने बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. परंतु, मालच नसल्याने या बाजारभाववाढीचा थोड्याच शेतकर्‍यांना फायदा होत असल्याचे दिसत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात कोथिंबीर, मेथी ही पालेभाज्यांची पिके वरचेवर शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. परंतु, यंदा या पालेभाज्यांच्या पिकांना अतिपावसाचा फटका बसला. या पावसामुळे अनेक मेथी, कोथिंबीर सडून नष्ट झाली. गुंतविलेले भांडवल वसूल झाले नाही. काही शेतकर्‍यांचे कोथिंबिरीचे पीक पावसात वाचले. या पिकाला सध्या व्यापार्‍यांकडून मोठी मागणी होऊ लागली आहे.
दरवर्षी दिवाळीच्या सणावेळी मेथी, कोथिंबिरीच्या या पालेभाज्यांच्या बाजारभावात वाढ होते. त्यामुळे शेतकरी या कालावधीत पालेभाज्यांची पिके घेतात. सध्या मेथीलाही शेकड्याला अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. हा बाजारभाव चांगला आहे.

अतिपावसाचा फटका मेथी, कोथिंबीर या पिकांना मोठ्या प्रमाणात बसला. अनेक शेतकर्‍यांनी घेतलेली ही पिके वाया गेली. त्यामुळे सध्या बाजारपेठांमध्ये पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. व्यापारी थेट शेतात जाऊन कोथिंबिरीची खरेदी करू लागले आहेत.
– संतोष शेळके, भाजीपाला व्यापारी

व्यापारी थेट शेतात येऊन पालेभाज्यांची खरेदी करू लागल्याने शेतकरी देखील बाजारपेठांमध्ये जाण्याऐवजी व्यापार्‍यांनाच पालेभाज्या विकत आहेत. यामध्ये मजुरी, वाहतुकीचे भाडे वाचून शेतकर्‍यांच्या हाती शिल्लक चांगली उरते.
– राहुल थोरात, शेतकरी

Back to top button