पिंपरखेडमध्ये ऊसाच्या शेतात आढळले चार बछडे, नागरिकांमध्ये भीती | पुढारी

पिंपरखेडमध्ये ऊसाच्या शेतात आढळले चार बछडे, नागरिकांमध्ये भीती

पिंपरखेड, पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे ऊसतोडणी सुरु असताना बिबट्याचे अंदाजे दहा दिवसांचे चार लहान बछडे आढळून आले आहेत. परिणामी या परिसरात बिबटे असल्याची धास्ती घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पिंपरखेड येथे बुधवारी (दि. २) शेतकरी बाळासाहेब पांडुरंग दरेकर यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु होती. ऊस तोडणी सुरु असताना ऊसाच्या सरीमध्ये बिबट्याचे लहान चार बछडे निदर्शनास आले. ऊसतोडणी कामगारांनी शेतमालक व संबंधित कारखान्याचे अधिकारी यांना ही माहिती दिली. याबाबत वनविभागास कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी यांना बछडे सापडल्याची माहिती मिळताच वनपाल गणेश पवार व महेंद्र दाते यांनी ऊसाच्या शेताकडे धाव घेतली.

शेतकरी दरेकर यांना शेतातील राहिलेली ऊस तोडणी बंद करण्यास सांगितले. सापडलेले बिबट्याचे बछडे या ऊसाच्या शेतातच असून रात्रीच्या वेळी बिबट्याची मादी येऊन या बछड्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल, असे वनविभागाचे अधिकारी यांनी सांगितले. पिलांच्या संरक्षणासाठी मादी हल्ला करण्याची शक्यता असल्याने या परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असून बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या असल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी वनविभागाकडे केली आहे.

१२ वर्षांमध्ये वाढली बिबट्यांची संख्या

बिबट मादी एका वेळी चार बछड्यांना जन्म देत असल्याचा अंदाज लावला जात आहे. बिबट्याची प्रजननक्षमता जास्त असल्याने या परिसरात झपाट्याने बिबट्याची संख्या वाढली आहे. गेले बारा वर्षांपासून या परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पहायला मिळत आहे.

 

Back to top button