ढगाळ वातावरणामुळे यंदा नोव्हेंबरमध्ये थंडी कमी | पुढारी

ढगाळ वातावरणामुळे यंदा नोव्हेंबरमध्ये थंडी कमी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याने थंडीचा कडाका कमी राहणार असून, डिसेंबर ते फेब—ुवारीदरम्यान कडाक्याची थंडी राहील. या कालावधीत अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत वर्तविला.
महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतात नैर्ऋत्य मान्सून पडत आहे. तो सरासरीपेक्षा 123 टक्के जास्त पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभर नोव्हेंबरमध्ये 30 टक्के पाऊस जास्त राहील. या काळात ढगाळ वातावरण राहिल्याने थंडीचा कडका कमी जाणवेल. केवळ हिमालयीन भाग, पूर्वोत्तर राज्यात थंडी जाणवेल.

अधूनमधून पाऊस…
बंगालच्या उपसागरात अधूनमधून चक्रीय स्थिती त्याचबरोबर कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत. परिणामी, महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत पाऊस पडेल. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये किमान तापमानात फारशी घट होणार नाही, असा अंदाज महापात्रा यांनी वर्तविला.

राज्यात डिसेंबर ते फेब—ुवारी कडाक्याची थंडी
महापात्रा यांनी सांगितले, की नोव्हेंबरअखेर राज्यात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर लागलीच डिसेंबर ते फेब—ुवारीपर्यंत कडक्याची थंडी राहील. या कालावधीत थोडाफार पावसाची शक्यता असली, तरी त्याचा अंदाज त्या-त्या वेळी दिला जाईल. मात्र, थंडीचे प्रमाण या तीन महिन्यांच्या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास लांबतोय…
देशात गेल्या काही वर्षांपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख लांबत आहे. दोन वर्षांपर्यंत 1 सप्टेंबर ही तारीख परतीच्या प्रवासाची होती. ती बदलून 17 सप्टेंबर करण्यात आली. मात्र, यंदा परतीच्या पावसाचा प्रवास देशासह राज्यातून 28 सप्टेंबरपासून सुरू झाला. राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास 15 ऑक्टोबरला सुरू होतो. मात्र, यंदा तो 23 ऑक्टोबरला गेला. हा प्रवास का लांबतोय, यावर अभ्यास सुरू आहे. दरम्यान, दक्षिण भारतातील र्नैऋत्य मान्सून सुरू होण्यास दहा दिवस उशीर झाला. या सर्वांचा परिणाम थंडीच्या हंगामावर होत आहे, असे महापात्रा यांनी स्पष्ट केले.

औरंगाबादचे तापमान राज्यात सर्वांत कमी
मंगळवारी औरंगाबाद शहराचे किमान तापमान राज्यात सर्वांत कमी 12.5 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. आठवड्यात सलग दुसर्‍यांदा राज्यात या शहराचा पारा 13 अंशांखाली घसरला.

राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान पुढीलप्रमाणे :

औरंगाबाद 12.5, नाशिक 12.6, पुणे 13.3, जळगाव 13.7, नगर 14.8, कोल्हापूर 17.5, महाबळेश्वर 13.5, सांगली 16.6, सातारा 14.4, सोलापूर 16.7, मुंबई 23.3, उस्मानाबाद 13.8, परभणी 14.4, नांदेड 16.4, अकोला 16, अमरावती 15.1, बुलढाणा 15.6.

Back to top button