पिंपरी : शहरातील द्रुतगती वर्तुळाकार मार्ग कागदावरच | पुढारी

पिंपरी : शहरातील द्रुतगती वर्तुळाकार मार्ग कागदावरच

मिलिंद कांबळे  :

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतुकीस चालना देण्यासाठी 31.40 किलोमीटर अंतराचा उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाचा (एचसीएमटीआर-हाय कॅपॅसिटी मास टॉन्झीस्ट रुट) सुधारित डीपीआर तयार होऊन अडीच वर्षे लोटले; तरी राज्य सरकारकडून त्या मार्गास ‘ग्रीन सिग्नल’ मिळत नसल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अद्याप  कागदावरच आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी तसेच, नागरिकांमध्ये खासगी वाहनांचा वापर कमी करण्यासाठी एचसीएमटीआर या सार्वजनिक वेगवान वाहतूक सेवेचा पर्याय सुमारे 25 वर्षांपूर्वी समोर आला होता.

अनेक वर्षांपासून भिंजत पडलेला हा प्रकल्प अखेर, सन 2019 मध्ये पुन्हा बाहेर काढण्यात आला. त्यासाठी, सन 2019 मध्ये महामेट्रोकडून त्या मार्गाचा डीपीआर तयार करून घेण्यात आला. त्याकरिता सुमारे 5 कोटींचा खर्च झाला. डीपीआरच्या मार्गात काही बदल व सुधारणा करून तो डीपीआर तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापौर, उपमहापौर, पक्षनेते व गटनेते यांच्यासमोर सादर केला.

त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात तो डीपीआर तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी 19 जानेवारी 2021 ला सादर केला. मात्र, पुणे महापालिका डीपीआरमध्ये खासगी मोटारीसाठी मार्ग दाखविल्याने त्यात बदल करावा. तसेच, पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेने एकत्रित नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली. त्यानुसार, पुण्याने नवा सुधारित डीपीआर तयार करून घेतला आहे.

त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. तसेच, आयुक्त पाटील यांचीही बदली झाली. नवीन आयुक्त शेखर सिंह यांच्यासमोर सादरीकरण केल्याने या मार्गास मंजुरीबाबतचा प्रस्ताव शिंदे-फडणवीस सरकारसमोर ठेवला जाणार आहे. त्यासंदर्भात प्रशासकीय कार्यवाही केली जात असल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. नव्या राज्य सरकारच्या भूमिकेवर या मार्गाचे भवितव्य ठरणार आहे.

31.40 किलोमीटर अंतराचा मार्ग :
तीस मीटर रुंदीचा हा 31.40 किलोमीटर अंतराचा एचसीएमआरटीचा एलिव्हेटर (उन्नत) मार्ग आहे. नाशिक फाटा, पिंपळे गुरव, सुदर्शननगर, कोकणे चौक, काळेवाडी फाटा, तापकीर चौक, पीसीएमसी-वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, संचेती स्कूल, क्रांतीवर नगर, थेरगाव बिर्ला रुग्णालय, पवनानदी पार करून वाल्हेकरवाडी, रानमळा हॉटेल, स्पाइन रस्ता, रेलविहार चौक, आकुर्डी रेल्वे स्थानक, निसर्ग दर्शन सोसायटी, गायरान, निगडी भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, स्पाइन रस्ता त्रिवेणीनगर, रूपीनगर, टाटा मोटर्स, जॅग्वार कंपनी (मर्सिडीज बेंझ) समोरून इंद्रायणीनगर, स्वामी समर्थ स्कूल, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी चौक, टेल्को रस्ता, सेंच्युरी एन्का, लांडेवाडी असा मार्ग आहे. हा मार्ग नाशिक फाटा ते चाकण मेट्रो मार्गास जोडला जाणार आहे.

निओ मेट्रोचा प्रस्ताव :
एचसीएमआरटीचा मार्ग एलिव्हेटर आहे. या मार्गावर ट्राम, लाइटरेल, बीआरटीएस, मोनोरेल, मेट्रो या वाहतूक सेवेचा पर्याय ठेवण्यात आला होता. मात्र, मेट्रोचा खर्च अधिक आहे. डीपीआर तयार करणार्‍या महामेट्रोने निओ मेट्रोला अनुसरून डीपीआर तयार केला. निओ मेट्रो ही टायरबेस असलेली 3 डब्यांचे इलेक्ट्रिक वाहन आहे. एकदा चार्ज झाल्यानंतर ती 50 ते 60 किलोमीटर अंतर धावते. त्यासाठी लोहमार्ग टाकण्याचा खर्च वाचणार आहे. एका वेळी 700 ते 750 प्रवाशी यातून प्रवास करू शकतात. मेट्रोपेक्षा त्याचा खर्च कमी असल्याने निओ मेट्रोचा प्रस्ताव पालिकेने स्वीकारला आहे.

2 हजार 300 कोटी रुपयांचा प्रकल्प :
पिंपरी-चिंचवड शहरातील या मार्गासाठी एकूण 2 हजार 300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तो पीपीपी, बीओटी, केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने की कर्जरोखे काढून महापालिकेने स्वत: तयार करायचा याबाबत सल्लागार एजन्सीकडून प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. तो निर्णय घेतला जाईल, त्यानुसार या मार्गासाठी निधी उभारला जाणार आहे.

Back to top button