पुणे : कचर्‍याकडे दुर्लक्ष; मुकादम निलंबित इतर तिघांवर दंडात्मक कारवाई | पुढारी

पुणे : कचर्‍याकडे दुर्लक्ष; मुकादम निलंबित इतर तिघांवर दंडात्मक कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  नेहरू रस्त्यावरील कचरा उचलण्याच्या वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील एका मुकादमावर निलंबनाची, तर दुसर्‍या एका मुकादमावर आणि दोन आरोग्य निरीक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील सार्वजनिक ठिकाणे व रस्त्यांच्या झाडणकामासाठी कायमस्वरुपी व कंत्राटी पद्धतीने हजारो सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.

या सेवकांकडून काम करण्यासाठी आणि सेवकांनी संकलित केलेला कचरा गाडीमध्ये टाकून परिसर स्वच्छ राहण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुकादम आणि आरोग्य निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरात स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून जनजागृती केली जात असताना मुकादम आणि आरोग्य निरीक्षक मात्र योग्य प्रकारे काम करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी कचर्‍याचे ढीग दिसतात.

या पार्श्वभूमीवर अधिकार्‍यांकडून विविध भागांना भेटी देऊन वारंवार पाहणी केली जाते. महापालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी नेहरू रस्त्याची पाहणी केल्यानंतर रस्त्यावर जागोजागी कचर्‍याचे ढीग निदर्शनास आले होते. त्या वेळी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकार्‍यांमार्फत संबंधित मुकादम आणि आरोग्य निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनीही या रस्त्याची पाहणी केल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे निदर्शनास आले. वारंवार सूचना करूनही परिस्थितीमध्ये सुधारणा होत नसल्याने सोमवारी (दि. 31) येथील एका मुकादमावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर आणखी एका मुकादमावर आणि दोन आरोग्य निरीक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती राऊत यांनी दिली.

Back to top button