पुणे : घनकचरा प्रकल्पाचा प्रत्येक गावासाठी आराखडा | पुढारी

पुणे : घनकचरा प्रकल्पाचा प्रत्येक गावासाठी आराखडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी आता घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्पाचा आराखडा तयार होणार आहे. निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर पंधरा संस्थांची कृती आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वीदेखील जिल्हा परिषदेने कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले, आता पुन्हा नव्याने सर्व गावांचा आराखडा तयार करून कचरा निर्मूलनासाठी पाऊल टाकले आहे. जिल्ह्यातील घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्पांच्या कामाला आता गती येणार आहे. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषदेने सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी संस्थाची नेमणूक केली आहे.

निविदांद्वारे आलेल्या संस्थांना त्यांच्या अनुभवानुसार गावांचे वाटप करून त्यांच्याकडून आराखडा तयार करून घेतला जाणार आहे. या प्रकल्प आराखड्यांच्या आधारे गावांचे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता देऊन त्या आधारे निधी उपलब्ध करून कामे प्रत्यक्षात सुरू होणार आहेत. ही कामे गतीने राबवून जिल्ह्यातील गावे कचरामुक्त करण्याचे जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे. दरम्यान, संस्थांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रस्ताव मागविण्यात आले होते. आलेल्या प्रस्तावांची छाननी करून पात्र निविदाधारकांना कार्यारंभ आदेश देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून देण्यात आली.

जिल्हा परिषदेने यापूर्वीही घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतला होता. परंतु त्याला गावपातळीवरून प्रस्ताव पाठविण्यास चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मोठ्या गावांमध्ये आणि शहरालगतच्या गावांमध्ये कचर्‍याची समस्या अतिशय गंभीर आहे. परंतु, जागेचा अभाव आणि प्रतिसाद कमी मिळाल्याने निधी असून, देखील प्रकल्प उभारणीला गती येऊ शकली नाही. आता जिल्हा परिषदेकडूनच आराखडा तयार केला जात असल्याने कामाला गती मिळेल, असे सांगण्यात येत आहे.

Back to top button