पुणे : 11 लाख मुलांना मेंदूज्वराची लस; महापालिकेच्या आरोग्य विभागाची तयारी सुरू

पुणे : 11 लाख मुलांना मेंदूज्वराची लस; महापालिकेच्या आरोग्य विभागाची तयारी सुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात 'जॅपनीज इनसेफिलायटिस' अर्थात मेंदूज्वरावरील लसीचा समावेश करण्यात आला आहे. तत्पूर्वी 1 ते 15 वर्षे वयोगटातील सुमारे 11 लाख मुलांना शाळांमध्ये जाऊन लसीकरण केले जाणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

कोरोनानंतर विषाणूजन्य आजारांबाबत सतर्कतेने पावले उचलली जात आहेत. जॅपनीज इनसेफिलायटिस अर्थात मेंदूज्वर या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. लसीकरणाबाबत राज्य कुटुंब कल्याण कार्यालयातर्फे याबाबत पुणे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

केंद्र शासनाने नियमित लसीकरण मोहिमेअंतर्गत जेई लसीकरण ठरावीक जिल्हे आणि महानगरपालिकांच्या हद्दीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, परभणी आणि रायगडचा समावेश करण्यात आला आहे. जेई लसीकरण मोहीम 1 ते 15 वर्षे वयोगटातील लाभार्थींना लसीचा डोस देऊन करण्यात येणार आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमात जेई लसीचा पहिला डोस 9 ते 12 महिने वयोगटात आणि दुसरा डोस 16 ते 24 महिने वयोगटातील लाभार्थींना देण्यात येतो. लसीची मात्रा 0.5 एमएल असून, लसीचा डोस स्नायूंमध्ये डाव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूस देण्यात येतो.

पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळा आणि अंगणवाडी केंद्रांची तसेच लाभार्थींची यादी करण्यास सांगण्यात आले आहे. सध्या सूक्ष्म कृती आराखडा, शीतसाखळी नियोजन, लसीकरण सत्रांचे नियोजन याबाबतची तयारी सुरू करण्यात आली आहे.
                            – डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका

काय आहे जॅपनीज इनसेफिलायटिस?
हा डास अथवा डुकरापासून संक्रमित होणारा विषाणूजन्य आजार आहे. अस्वच्छता हे यामागील मुख्य कारण आहे. डोकेदुखी, तीव— ताप, उलटी होणे, झटका येणे, मळमळणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. भारतात या आजाराचा पहिला रुग्ण 1955 मध्ये आढळून आला होता. 2016 मध्ये भारतात या आजारामुळे 283 लोकांचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news