अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा; वडगावातील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने उचलले | पुढारी

अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा; वडगावातील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने उचलले

बारामती; पुढारी वृत्तसेवा: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने वडगाव निंबाळकर येथून तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

वडगाव निंबाळकर येथील ही व्यक्ति फेब्रुवारी २०२२ मध्ये बेपत्ता झाली होती. तो बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांकडून पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या पुरुषाचा मृतदेह लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळाला होता. त्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरु करण्यात आला होता.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित महिलेच्या प्रियकरासह अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रियकराने तिच्या पतीचा खून केल्याची कबुली दिली आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या या खून प्रकरणामुळे वडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

Back to top button