पिंपरी : 58 कोटींचा दिवाळी बोनस; पालिकेच्या दहा हजार कर्मचार्‍यांचा आनंद द्विगुणित | पुढारी

पिंपरी : 58 कोटींचा दिवाळी बोनस; पालिकेच्या दहा हजार कर्मचार्‍यांचा आनंद द्विगुणित

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांना दरवर्षी दिवाळीचा बोनस दिला जातो. पालिका आस्थापनेवरील तसेच, कंत्राटी व मानधनावरील अधिकारी व कर्मचार्‍यांना तब्बल 57 कोटी 88 लाखांचा बोनस दिवाळीपूर्वीच दिला गेला. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांची दिवाळी आनंदात मोठी भर पडल्याचे चित्र आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बोनस देणारी राज्यातील एकमेव महापालिका असल्याचा दावा केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ आणि महापालिकेत 5 वर्षांसाठी बोनसचा करार झाला आहे. तो कालावधी संपल्याने पुन्हा 9 ऑक्टोबर 2021 ला करार करण्यात आला. तो करार कामगार कायद्यानुसार कामगार उपायुक्त कार्यालयाकडे नोंदविण्यात आला आहे. या करारानुसार पालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचार्‍यांना 8.33 टक्के सानुग्रह अनुदान व 20 हजार रूपये जादा रक्कम दिली जाते. हा बोनस 2020-21 ते 2014-25 असे पाच वर्षे दिला जाणार आहे.

बोनसची पालिकेची अनेक वर्षांची प्रथा, परंपरा असल्याचा दावा केला जात आहे. यंदा बोनससाठी तब्बल 57 कोटी 88 लाख रक्कम वितरीत करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी बोनस मिळाल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दिवाळीच्या आनंदात भर पडली होती.
साधारण एका वेतनाइतका बोनस

साधारण एका महिन्याचा वेतना इतकी रक्कम बोनस म्हणून प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍यास मिळते. पालिका आस्थापनेवरील एकूण 7 हजार 84 अधिकारी व कर्मचारी आहेत. तसेच, सन 2021-22 मधील सेवानिवृत्त कर्मचारी, बालवाडी शिक्षक, मानधन व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी असे सुमारे 10 हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, विभागप्रमुखांसह सफाई कामगार व शिपायांपर्यंत सर्वांना बोनस दिला जातो. त्यामुळे 50 हजारांपासून 1 लाख 50 हजार रूपयांपर्यंत बोनस कायम असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना मिळाला आहे.

Back to top button