पुणे : सरळसेवेची 75 हजार पदे भरणार; पदभरतीवरील निर्बंधांतील शिथिलता 15 ऑगस्ट 2023 पर्यंतच | पुढारी

पुणे : सरळसेवेची 75 हजार पदे भरणार; पदभरतीवरील निर्बंधांतील शिथिलता 15 ऑगस्ट 2023 पर्यंतच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सरळसेवा कोट्यातील 75 हजार पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी पदभरती निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार सुधारित आकृतिबंध अंतिम केलेल्या विभाग कार्यालयांना सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के, तर सुधारित आकृतिबंध अंतिम न केलेल्यांना रिक्त पदे 80 टक्क्यांपर्यंत भरण्यास मुभा देण्यात आली. मात्र, निर्बंधांतील शिथिलता केवळ 15 ऑगस्ट 2023 पर्यंतच लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वित्त विभागाच्या 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित आकृतिबंध अंतिम निश्चित झालेल्या विभाग, कार्यालयांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात आली आहे. अन्य संवर्गातील रिक्त पदांच्या 50 टक्के पदे भरण्याची मुभा आहे. सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला नाही अशा विभाग, कार्यालयांना पदे भरण्यास उपसमितीची मान्यता आवश्यक असते.

प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या 2016 च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम मंजूर न केलेल्या विभाग, कार्यालयांतील पदे भरतीसाठी उपलब्ध होण्यासाठी वित्त विभागाच्या 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेले पदभरतीबाबतचे निर्बंध शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने पदभरती निर्बंधांच्या शिथिलतेबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. पदभरती निर्बंधांमध्ये देण्यात आलेली शिथिलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंतच लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या 30 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

सुधारित आकृतिबंधाचे काम तत्परतेने करण्याचे निर्देश
वित्त विभागाच्या 2016 च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अंतिम न केलेल्या विभागांनी त्यांचा, त्यांच्या आधिपत्याखालील कार्यालयांतील पदांचा आढावा घेऊन उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर करण्याची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यसेवा 2022 मध्ये 462 पदांची भर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) होणार्‍या राज्यसेवा परीक्षा 2022 मध्ये 462 पदांची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण 623 पदांसाठी भरती परीक्षा राबवली जाणार आहे. एमपीएससीतर्फे 11 मे रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात 161 पदांचा समावेश होता. मात्र, शासनाकडून 462 पदांचे अतिरिक्त मागणीपत्र देण्यात आल्याने या पदांची भर पडली आहे.

त्यामुळे आता 623 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. उपजिल्हाधिकारी संवर्गासाठी वयोमर्यादा 1 एप्रिल 2023 रोजी गणण्यात येईल. याव्यतिरिक्त सर्व पदांसाठी वयोमर्यादा जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकास, म्हणजे 1 सप्टेंबर 2022 रोजी गणण्यात येईल. तसेच 17 डिसेंबर 2021च्या शासन निर्णयानुसार 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत वयाधिक ठरणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील. पदसंख्या आणि आरक्षणात कोणताही बदल झाल्यास त्याबाबतचा तपशील वेळोवेळी एमपीएससीच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

Back to top button