पिंपरी : महापालिका शाळा होणार कॉन्व्हेंटच्या तोडीच्या | पुढारी

पिंपरी : महापालिका शाळा होणार कॉन्व्हेंटच्या तोडीच्या

मिलिंद कांबळे : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत. आता दहा शाळा निश्चित करून त्या अधिक दर्जेदार करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे. त्या शाळांमध्ये आपल्या पाल्यास प्रवेश मिळण्यासाठी पालकांनी रांगा लावल्या पाहिजेत, अशा दर्जाच्या शाळा असतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. या नव्या योजनेला कितपत यश मिळते, हे लवकरच स्पष्ट होईल.

दिल्ली दौर्‍यानंतरही परिस्थितीत बदल नाही
पालिका शाळेत ‘दिल्ली म्युन्सिपल स्कूल’चा पॅटर्न राबविण्यासाठी पालिकेच्या अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, गटनेते, नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी दिल्ली शहराचा दौरा केला होता. त्यानंतर भरभरून आश्वासने देण्यात आली. पालिकेच्या शाळांची गुणवत्ता आता बदलणार असे सांगण्यात आले. मात्र, त्या दौर्‍यास साडेचार वर्षे लोटले तरी, अद्याप शाळा आहे तशाच आहेत.

पीसीएमसी पब्लिक स्कूल पॅटर्न
तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी पालिका शाळांसाठी नवीन पॅटर्न आणला होता. ‘पीसीएमसी पब्लिक स्कूल’ या पॅटर्ननुसार शाळेचे एकसारखे बोधचिन्ह करण्यात येत आहे. शाळांची रचना एकसारखी असणार आहे. तसेच, नामफलक एकसमान लावण्यात येणार आहेत. पालिकेच्या शाळांमध्ये एकसमानता असावी आणि ते लगेच ओळखले जावेत यासाठी त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असा अधिकार्‍यांनी दावा केला आहे.

शिक्षकांना दिले जाणार प्रशिक्षण
त्या शाळांतील शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे. गरजेनुसार तेथे आणखी अनुभवी शिक्षक नेमले जातील. शाळा इमारतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शिक्षकांसह विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबविल्या जातील. त्या ठिकाणी शिक्षणासोबत क्रीडाविषयक प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यासाठी खासगी शाळांची मदत घेतली जाणार आहे. तसेच, आकांक्षा फाउंडेशनला काही शाळा चालविण्यासाठी दिल्या जाणार आहेत.

ई-लर्निंग स्कूलची रडतखडत अंमलबजावणी
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्यावतीने पालिकेच्या 113 शाळांमध्ये ई-लर्निग प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रत्येक शाळेत अद्यावत सुविधा उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांना ऑलनाइन धडे दिले जातील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, खरेदी केलेले साहित्य दुय्यम दर्जाचे असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या प्रकल्पाचे काम रडतखडत पूर्ण झाले.

पालिकेच्या दहा शाळांची निवड करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या दहा शाळांची गुणवत्ता व दर्जा सुधारल्यानंतर टप्पाटप्प्याने इतर शाळांमध्ये ती योजना राबविली जाईल.
                                                   – शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

पालकमंत्र्यांचेही प्रोत्साहन
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या योजनेला प्रोत्साहन दिले आहे. दहा चांगल्या शाळांची निवड करून त्यांना सर्व त्या आवश्यक बाबी उपलब्ध करून द्या आणि त्यावर फोकस ठेवा. त्या दहा शाळांचा शैक्षणिक दर्जाचा आलेख वाढवा. त्यानंतर इतर शाळांकडे विशेष लक्ष द्या. त्यामुळे पालिकेच्या सर्व शाळा प्रगत होतील, अशा सूचना त्यांनी आयुक्तांना केल्या आहेत.

शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर
पालिकेने निश्चित केलेला तो पॅटर्न कायम ठेऊन त्यावर काम करण्याचा निर्णय आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आहे. दहा शाळांची निवड करण्यासाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. शैक्षणिक दर्जा, कामगिरी, वातावरण, विद्यार्थी संख्या, तेथील सेवा व सुविधा तसेच, इतर बाबी तपासल्या जाणार आहेत. सर्व शाळांमधून पहिल्या टप्प्यात दहा शाळांची निवड केली जाणार आहे.

Back to top button