पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द येथे हाॅटेल कामगारांचा खून; मयताची माहिती देणाराच निघाला आरोपी | पुढारी

पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द येथे हाॅटेल कामगारांचा खून; मयताची माहिती देणाराच निघाला आरोपी

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पुणे-पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द (ता. हवेली ) येथील हाॅटेल शौर्यमध्ये दोन कामगारांत झालेल्या किरकोळ वादातून एका कामगाराने दुसऱ्या कामगाराची दारुच्या नशेत झोपलेल्या कामगाराच्या डोक्यात कुळवाच्या लोखंडी अवजाराच्या पट्टीने प्रहार करून निघृण हत्या केली. हा प्रकार सोमवारी (दि. ३१) मध्यरात्रीच्या सुमारास हाॅटेलमध्ये घडला.

कामगाराला कोणीतरी ठार मारले आहे याची माहिती मालकाला सांगणाऱ्या कामगारानेच खुन केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हत्या झालेल्या कामगाराचे नाव रतन बुरन मंडी ( वय ३३, मुळ रा. पश्चिम बंगाल , सध्या रा.हाॅटेल शौर्य, गोऱ्हे खुर्द ) असे असुन या प्रकरणी हवेली पोलीसांनी संशयित आरोपी समीर वैतन्य विश्वास (वय २८, मुळ रा. पश्चिम बंगाल) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत रतन मंडी हा सात वर्षांपासून हाॅटेलमध्ये काम करत आहे. रविवारी रात्री हाॅटेल बंद करून मालक सोमनाथ जावळकर घरी निघून गेले. हवेली पोलीसांनी सांगितले, मयत रतन मंडी व आरोपी समीर बिश्वास यांच्यात दररोजच्या कामावरुन वादविवाद सुरू होते. तसेच आर्थिक कारणांवरूनही त्यांच्या सतत भांडणे झाली होती. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने दारू पिल्यानंतर त्यांच्यात भांडणं झाले.

मध्यरात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास रतन मंडी झोपलेला असताना आरोपी समीर बिश्वास याने कुळवाच्या लोखंडी पासेने मंडी याच्या तोंडावर व डोक्यावर जोरदार प्रहार केले. त्यात तो जागीच ठार झाला. रतन हा निपचित पडल्याने समीर हा घाबरून गेला. पहाटेच्या सुमारास समीर याने रतन ह्याला कोणीतरी मारले आहे, असे मालक जावळकर यांना सांगितले. त्यानंतर मालकाने हवेली पोलिसांनी घटनेची माहिती दिली.

हवेली ठाण्याचे पोलिस निरीक्षक
सदाशिव शेलार यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक निरंजन रनवरे, पोलिस निरीक्षक शितल टेंबे, सहाय्यक फौजदार सुभाष गिरे, हवालदार निलेश राणे, दिपक गायकवाड, गणेश धनवे, रामदास बाबर, महेश कांबळे, संतोष भापकर, अतुल कोंडेकर, रजनीकांत खंडाळे यांच्या पोलिस पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. सकाळी रतन याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला.
पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले, या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे. संशयित म्हणून समीर बिश्वास यास ताब्यात घेतले आहे.

Back to top button