राहु : आ. राहुल कुल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव | पुढारी

राहु : आ. राहुल कुल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

राहु; पुढारी वृत्तसेवा: दौंडचे आमदार अ‍ॅड्. राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर रविवारी शुभेच्छांचा वर्षाव झाला तालुक्यातील तसेच राज्य आणि जिल्ह्यातून आलेल्या चाहत्यांची शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच राहू (ता. दौंड) येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. आमदार कुल यांच्या समवेत माजी आमदार रंजना कुल तसेच आमदार कुल यांच्या पत्नी, भाजप महिला मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा कांचन कुल यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.

आमदार राहुल कुल यांच्या आवाहनानुसार हार व बुकेऐवजी शुभेच्छुकांनी वह्या आणल्या होत्या. परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थांनी विविध मान्यवर, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते, विविध सामाजिक संघटना तसेच व्यापारी, कामगार, शेतकरी वर्गांनी कुल यांना शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. 23 दिव्यांगाना कुल यांच्या स्थानिक विकास निधीतून इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात आले. खामगाव तांबेवाडी येथे सुखदेव चोरमले यांनी 350 कुटुंबांना किराणा साहित्याचे मोफत वाटप केले. राहूचे सरपंच दिलीप देशमुख यांच्या संकल्पनेतून परिसरातील सुमारे दीडशे ज्येष्ठ नागरिकांचा राहू ग्रामपंचायतीच्या वतीने भेटवस्तू, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मगरवाडी येथे भाऊसाहेब जगताप यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राहू येथे देशमुख परिवाराच्या माध्यमातून आधारवड भिंतीचे अनावरण करण्यात आले व मिठाईचे वाटप करण्यात आले तर मिरवडी येथे रक्तदान शिबिर झाले.

वाढदिवस सोशल मीडियावर गाजला
सध्या सोशल मीडियावर सेल्फीचे प्रचंड वेड आहे. याला आमदार राहुल कुल यांचा वाढदिवसही अपवाद ठरला नाही. कुल यांचा वाढदिवस सोशल मीडियावरही उत्साहात साजरा करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक तरुण कार्यकर्त्यांनी फेसबुक तसेच व्हॉट्सअप वर शुभेच्छा देतानाचे फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे वाढदिवस सोशल मीडियावर चांगलाच गाजला.

ज्येष्ठ नेत्यांच्या फोनवरून शुभेच्छा
आमदार कुल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे आदींसह राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

 

Back to top button