नायगाव : मावडी सुपे रस्त्याची दुरवस्थाच | पुढारी

नायगाव : मावडी सुपे रस्त्याची दुरवस्थाच

नायगाव; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुक्यातील सासवड-सुपे रस्त्यावरून मावडी सुपे गावाला जोडणार्‍या साडेतीन किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यालगत असलेल्या वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थ व शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेता निधीची तरतूद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या पंधरा वर्षांत पुरंदर तालुक्यातील अनेक गावे व वाड्यावस्त्या चांगल्या प्रतीच्या रस्त्यांनी जोडली गेली आहेत. पूर्व पुरंदरमधील मावडी सुपे ते पिसर्वे फाटा हा साडेतीन किलोमीटर रस्ता याला अपवाद आहे.

श्री क्षेत्र भुलेश्वर ते जेजुरीचा खंडोबा या दोन प्रमुख देवस्थानांना जोडणारा पूर्वीचा माळशिरस, मावडी सुपे, पिंपरी, नाझरे सुपे ते जेजुरी असा जवळचा मुख्य मार्ग आहे. माळशिरसपासून लिंबाचीवाडी, पिसर्वे फाटापर्यंतचा रस्ता जवळपास पूर्ण झाला आहे. जेजुरीपासून मावडी सुपेपर्यंतचा रस्तादेखील चांगल्या प्रतीचा झाला आहे. केवळ मावडी गावापासून पिसर्वे फाटा असा साडेतीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहत्या पाण्याची चारी पडली आहे.

यामुळे या रस्त्यालगत असलेल्या मावडी गावच्या वस्त्यावरील ग्रामस्थांना खडतर प्रवास करावा लागत आहे. याच रस्त्याने यापूर्वी एसटीने भाविक, ग्रामस्थ, विद्यार्थी प्रवास करीत होते. पर्यायी रस्ते तयार झाल्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. येथील ग्रामस्थांना मात्र या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. या रस्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी मावडी सुपे ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button