इंदापूर तालुक्यात रानगव्याचे दर्शन | पुढारी

इंदापूर तालुक्यात रानगव्याचे दर्शन

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यातील काही भागात सध्या जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. रविवारी (दि.30) रोजी कांदलगाव व तरटगाव (ता.इंदापूर) येथील परिसरात एक रानगवा आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यंतरी लोणी देवकर परिसरातील एका विहिरीमध्ये मगर आढळून आली होती. तालुक्यात यापूर्वीदेखील बिबट्या, मगर आदींसह जंगली प्राणी आढळून आले होते.

उजनी धरणाच्या पायथ्याशी या पट्ट्यात अनेक शेतकर्‍यांची शेती आहे. तेथे अनेकांचे गोठे आहेत. गवा अचानक जनावरांच्या कळपात दाखल होतो. वेळप्रसंगी तो शेतकर्‍याच्या अंगावर ही धावून येतो. रानगवा शेतकर्‍यांच्या चारा पिकांसह इतर पिकाचे ही नुकसान करीत असल्याने वन विभागाने तत्काळ याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

अद्याप तरी या जंगली रानगव्यांनी शेती तसेच माणसांना कसलीही इजा केली नसल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. नागरिकांनीदेखील या रानगव्यांपासून दूर राहावे आणि गवे आढळून आल्यास त्यांना त्रास देऊ नये. शेतातील काही पिकांचे नुकसान केल्यास झालेल्या नुकसानभरपाई देण्यासाठी पंचनामा करून अहवाल पाठवण्यात येईल. नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. दरम्यान, या रानगव्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मागील काही दिवसांत तालुक्यातील विविध ठिकाणी रानगवे आढळून आले आहेत. ते ज्या ठिकाणी आढळले आहेत. त्या ठिकाणी आमचे वन कर्मचारी तैनात असून वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आल्यानंतर त्यांना जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी सोडले जाईल. नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागाला सहकार्य करावे, असे इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी
यांनी सांगितले.

Back to top button