पुणे : डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना करा: आयुक्त तुकाराम मुंढे यांची प्रशासनाला सूचना | पुढारी

पुणे : डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना करा: आयुक्त तुकाराम मुंढे यांची प्रशासनाला सूचना

पुणे : शहरात यंदा डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. संशयितांचे प्रमाण वाढत असून खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणा-या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. या वर्षी शहरात डेंग्यूच्या 547 रुग्णांचे निदान झाले असून, केवळ ऑक्टोबर महिन्यात 148 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी काटेकोर उपाययोजना करा, अशी सूचना आरोग्य विभागाचे राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिल्या आहेत.

दिवाळीच्या दिवसांमध्ये 23 ते 29 ऑक्टोबर या आठवड्यात 188 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 72 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी 28 ऑक्टोबर रोजी 44 रुग्णांचे, तर 27 ऑक्टोबर रोजी 23 रुग्णांचे निदान झाले. यावर्षी 102 रुग्णांमध्ये चिकुनगुनियाचे निदान झाले आहे. डासांची उत्पत्तीस्थाने सापडल्याने संबंधित 3065 जणांना नोटीस देण्यात आली आहे, तर 2 लाख 9 हजार 50 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आरोग्य प्रमुखांकडून घेतली माहिती
पुणे विभागात जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेतल्यानंतर ज्या महापालिका हद्दीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, त्या महापालिकांच्या आरोग्य प्रमुखांना फोन करून मुंढे यांनी संवाद साधला. ज्या भागात डेंग्यू वाढला त्या भागातील महापालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांना फोन करण्यात आले आहेत. डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत असल्याने डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट करण्याच्या सूचना मुंढे यांनी दिल्या आहेत.

शहरात संशयित रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यात जास्त दिसत होती. डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट करण्यात येत आहेत. डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आरोग्य विभागाचे राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूचना केल्या आहेत.
                                 – डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

या वर्षातील रुग्ण स्थिती
महिना संशयित पॉझिटिव्ह
जानेवारी 160 16
फेब्रुवारी 117 28
मार्च 128 22
एप्रिल 84 42
मे 58 18
जून 154 17
जुलै 746 62
ऑगस्ट 1062 73
सप्टेंबर 1188 121
ऑक्टोबर 984 148
एकूण 4681 547

(स्त्रोत: आरोग्य विभाग, पुणे महापालिका)

Back to top button