पुणे : आणखी 25 ठेकेदार काळ्या यादीत; क्षेत्रीय कार्यालयांकडील 255 रस्ते आढळले निकृष्ट | पुढारी

पुणे : आणखी 25 ठेकेदार काळ्या यादीत; क्षेत्रीय कार्यालयांकडील 255 रस्ते आढळले निकृष्ट

पांडुरंग सांडभोर
पुणे : महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आलेल्या 255 रस्त्यांची कामे निकृष्ट झाली असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे करणार्‍या आणखी 25 ठेकेदारांना काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्याचा आणि याला जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

पावसाळ्यात शहरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली. यामधील अनेक रस्त्यांचा दोष दायित्व कालावधी (डिफेक्ट लायबिलिटी पीरिअड) संपला नसतानाही रस्त्यांवर खड्डे पडल्याचे आढळून आले होते. महापालिकेच्या पथ विभागाच्या मुख्य खात्याकडून करण्यात आलेल्या 17 रस्त्यांचे निकृष्ट काम करणार्‍या 13 ठेकेदारांना सहा महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई गत महिन्यात करण्यात आली होती.

त्यानंतर आता क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर निकृष्ट कामे करणार्‍या ठेकेदारांचा या यादीत समावेश होणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांकडून गेल्या तीन वर्षांत 2 हजार 320 रस्त्यांची कामे करण्यात आली. या सर्व रस्त्यांची कार्यकारी अभियंतानिहाय यादी करून प्रत्यक्ष 734 रस्त्यांची जागानिहाय पाहणी करण्यात आली होती.

त्यात 255 रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याचे या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे या सर्व निकृष्ट रस्त्यांची कामे करणार्‍या 25 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या कारवाईचा प्रस्ताव पथ विभागाने मुख्य अभियंत्यांमार्फत आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे मंजुरीसाठी ठेवला आहे.

याशिवाय, या रस्त्यांची जबाबदारी असलेले कनिष्ठ अभियंता व उपअभियंता यांच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

ठेकेदारांची संख्या वाढणार
क्षेत्रीय कार्यालयाकडून 2 हजार 320 रस्त्यांची कामे झाली आहेत. मात्र, यामधील 734 रस्त्यांचीच पाहणी झाली असल्याने प्रशासनाने तूर्तास अंतरिम अहवाल ठेवला आहे. या सर्व रस्त्यांची तपासणी झाल्यानंतर निकृष्ट रस्त्यांची आणि संबंधित ठेकेदार यांचीही संख्या वाढणार असल्याचे स्पष्ट आहे.

Back to top button