गडचिरोलीत काम ऐतिहासिक; अंकित गोयल यांचे डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून कौतुक | पुढारी

गडचिरोलीत काम ऐतिहासिक; अंकित गोयल यांचे डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून कौतुक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘गडचिरोली येथे अंकित गोयल यांनी केलेले काम ऐतिहासिक आहे. गडचिरोलीत मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा ही मोठी कामगिरी त्यांनी केली आहे. अशा व्यक्तीच्या हातात आपण कार्यभार सोपवतोय याचा मोठा आनंद होत आहे,’ अशी भावना डॉ. अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार गोयल यांच्या हाती देताना व्यक्त केली.

पाषाण रस्त्यावरील पुणे अधीक्षक कार्यालयातील भीमाशंकर सभागृहात डॉ. देशमुख यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, बारामती उपविभागीय कार्यालयाचे अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी नवनियुक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी डॉ. देशमुख यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलिस दलाचा पदभार स्वीकारला.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘पुणे ग्रामीणमध्ये औद्योगीकरण, शहरीकरण वाढत आहे. सर्वात जास्त महामार्ग पुण्यातून जातात. अपघात मोठ्या प्रमाणात होतात. पुण्याचा सर्वात वेगवान विकास होत आहे. कमी मनुष्यबळात काम करणे हेदेखील आव्हान आहे.’ मला माझ्या सहकार्यांचे आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभले, त्यामुळे चांगले काम करता आले, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

गोयल म्हणाले, ‘पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी बदली होणे हे बक्षीस मिळाल्यासारखे असले तरी येथे काम करणे आव्हान आहे. ग्रामीण दलात संसाधनांची कमतरता असून येथे राजकीय आव्हाने तसेच गुन्हेगारीचे आव्हान आहे, त्याला तोंड देणे कठीण आहे.’
‘कोणतीही परिस्थिती असो, काम करताना डॉ. देशमुख यांना मी कधीही चिडलेले पाहिले नाही. त्यांनी प्रत्येक परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळली. अधीक्षक पदावर डॉ. देशमुख यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. त्याच मार्गावर मीदेखील चांगले काम करणार आहे,’ अशी ग्वाही गोयल यांनी पदभार स्वीकारताना दिली.

Back to top button