पुणे : साखर आयुक्तालयातील निम्मी पदे रिक्त

पुणे : साखर आयुक्तालयातील निम्मी पदे रिक्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्याच्या साखर उद्योगाची उलाढाल सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या घरात गेलेली असून शाश्वत उत्पन्नाची हमी असल्याने ऊस पिकाखालील क्षेत्रही वाढत आहे. तर दुसरीकडे साखर उद्योगाच्या कायदेशीर नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या येथील साखर आयुक्तालयातील कर्मचार्‍यांची पन्नास टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे गतिमान कामकाज व नियंत्रणावर काहीशी मर्यादा येत असून ही पदे केव्हा भरली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

साखर आयुक्तालयाची स्वतःची आस्थापना नाही, तर सहकार आयुक्तालय व अन्य विभागातील आस्थापनेवरील अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीने साखर आयुक्तालयात नियुक्त्या केल्या जातात. ज्यामध्ये प्रामुख्याने सहकार विभागासह कृषी व सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश राहतो. साखर आयुक्तालयातील मंजूर पदसंख्या 103 आहे.

त्यापैकी भरलेली पदसंख्या 53 असून सुमारे 50 पदे रिक्त आहेत. ज्यामध्ये कृषी विभागातून प्रतिनियुक्तीवर साखर आयुक्तालयात नियुक्त करण्यात येणारे साखर सहसंचालक (विकास) हे महत्त्वाचे पद सध्या रिक्त आहे. अतिरिक्त पदभार देऊन काम सुरू आहे. याशिवाय कार्यकारी अभियंता 1, लघुलेखक-उच्चश्रेणी 3, लघुलेखक-निम्नश्रेणी 4, वरिष्ठ लिपिक 11, लघुटंकलेखक 1, कनिष्ठ लिपिक 14, वाहनचालक 3, दप्तर बंद 1 आणि शिपाई पदाच्या 12 जागा रिक्त आहेत.

विशेष म्हणजे कनिष्ठ लिपिकाच्या मंजूर 14 पैकी आणि शिपाई मंजूर 12 पदांपैकी 10 पदे रिक्त आहेत. त्यामुळे सहकार आयुक्तालय साखर आयुक्तालयातील रिक्त जागांचा प्रश्न केव्हा सोडविणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कार्यकारी अभियंता हे पद सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियुक्त केले जाते.

सहकारी साखर कारखान्यांच्या निविदा, हवाई अंतर, कारखान्याचा आयइएम तथा औद्योगिक परवाना, निविदांची निश्चितीसाठी हे पद महत्त्वाचे आहे. मात्र, कार्यकारी अभियंता हे एकच पद असूनही ते जुलै 2021 पासून रिक्तच असल्याने अडचणी कायम असल्याचे सांगण्यात आले. रिक्त पदांबाबत साखर आयुक्तालयाने वेळोवेळी सहकार विभाग, कृषी विभागाकडे अधिकारी, कर्मचार्‍यांची मागणी करूनही पूर्ण पदे भरली गेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रादेशिक साखर सहसंचालकातही रिक्त पदे
साखर आयुक्तालयाच्या अधिनस्त राज्यात कार्यरत 8 प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांसाठी 77 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 45 पदे भरलेली असून 32 रिक्त पदांमुळे क्षेत्रीय स्तरावर यंत्रणांना कामे करण्यास सर्वाधिक अडचणी येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सहसंचालक 1, कृषी अधिकारी 4, वरिष्ठ लिपिक 3, कनिष्ठ लिपिक 4, वाहनचालक 8, लघुलेखक 1, लघु टंकलेखक 6, शिपाई 5 याप्रमाणे पदे रिक्त आहेत. वास्तविक साखर आयुक्तालयाचे सर्व कामकाजच साखर सहसंचालक कार्यालयांच्या अहवालांवर अवलंबून असते. त्याठिकाणीही पदे रिक्त राहण्यामुळे कामाच्या गतिमानतेस अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news