पुणे : पार्सल विभागाचा ‘मेगा ब्लॉक’; भोंगळ कारभारामुळे वस्तू पोहचविण्यास रेल्वेकडून होतोय उशीर | पुढारी

पुणे : पार्सल विभागाचा ‘मेगा ब्लॉक’; भोंगळ कारभारामुळे वस्तू पोहचविण्यास रेल्वेकडून होतोय उशीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: रेल्वेच्या पुणे विभागामार्फत पार्सलसेवा सुरू आहे. या सेवेमार्फत प्रवाशांचे पार्सल वेळेत पोहचविणे रेल्वे प्रशासनाला बंधनकारक आहे. परंतु, येथून पार्सल निश्चित ठिकाणी पोहचविण्यास सध्या प्रचंड उशीर होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण असून, परिणामी रेल्वेच्या पार्सल विभागात भोंगळ कारभार सुरू असल्याचे दिसत आहे.

रेल्वेच्या पुणे स्थानकावरून दररोज 230 रेल्वेगाड्यांची ये-जा असते. त्यामार्फत 70 ते 80 हजार प्रवासी नॉन-पिक सीझनमध्ये प्रवास करतात, तर पिक सीझनमध्ये प्रवाशांची संख्या एक ते दीड लाखाच्या घरात जाते. रेल्वेच्या प्रत्येक गाडीला दोन राखीव डबे हे पार्सल सेवेसाठी ठेवण्यात आलेले असतात.

मात्र, तरीदेखील पुणे रेल्वे स्थानकावरून जाणारी इतर पार्सल आणि दुचाकींना निश्चित स्थळी पोहचण्यास विलंब होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुण्यातील पार्सल विभागाचे कामकाज सुधारून, शिस्तबध्द काम सुरू करण्यावर भर दिला पाहिजे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

अनधिकृत हुंडेकर्‍यांचा सुळसुळाट…
रेल्वे प्रशासनाने पार्सल विभागाकरिता अधिकृत हुंडेकर्‍यांचे (पार्सल एजंट) टेंडर काढणे आवश्यक होते. मात्र, अद्याप ते काढण्यात आलेले नाही. त्यामुळे अनधिकृतरीत्या हुंडेकरी म्हणून वावरणार्‍या लोकांचा येथे सुळसुळाट झाला आहे. तातडीने पार्सल पोहचविण्यासाठी ते संबंधित व्यक्तीकडून अतिरिक्त 100 ते 200 पेक्षा अधिक रकमेची मागणी करून जो पैसे देईल, त्याचे पार्सल ते तातडीने पोहचवत आहेत. तर जे अतिरिक्त पैसे देत नाहीत, त्यांचे पार्सल पोहचविण्यासाठी बराच विलंब करीत आहेत.

प्रवाशाचा असाही अनुभव
अविनाश जामगे नावाच्या एका प्रवाशाने पुण्याहून दिल्लीला आपली दुचाकी पाठविण्यासाठी 19 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजून 14 मिनिटांनी बुकिंग केले होते. त्याला तीन ते चार दिवसांत दुचाकी दिल्लीला मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्याला ती अद्याप मिळाली नाही. त्याने दिल्लीहून सहा दिवसांनी म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी पुणे रेल्वे पार्सल विभागाशी संपर्क साधला, तेव्हा त्याची दुचाकी पुणे रेल्वे स्थानकातच असल्याची माहिती मिळाली. सहा दिवस उलटूनही त्या प्रवाशाची दुचाकी पार्सलसाठी पाठविण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या प्रवाशाने नाराज होऊन नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

रेल्वेतून जाणारी प्रवाशांची पार्सल प्रवाशांसाठी खूपच महत्त्वाची असतात. यातून काहींची औषधेसुध्दा पाठवली जात असतात. त्यांना ती वेळेत मिळणे आवश्यक असते. मात्र, रेल्वे प्रशासनाने अशाप्रकारे उशीर केल्यास प्रवाशांचे नुकसान होणार आहे. प्रत्येक गाडीत दोन डबे पार्सलसाठी राखीव असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या वस्तू वेळेत प्रवाशांना पोहचविणे बंधनकारक आहे.

                                                                                      – हर्षा शहा,
                                                                            अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

रेल्वेच्या काही गाड्या आठवड्याने धावतात. त्यामुळे त्या गाड्यांमार्फत जाणारी पार्सल आठ दिवस पुणे स्थानकावर असतात. त्यासोबतच सध्या पार्सलची संख्या वाढल्याने जागेची थोडी समस्या निर्माण झाली आहे. रेल्वेच्या बाहेरच्या विभागातून येणार्‍या गाड्या फुल्ल असतात. त्यामुळे पुण्यातून जाणार्‍या पार्सलसाठी या गाड्यांमध्ये जागा नसते तसेच पुण्यातून जाणार्‍या गाड्यादेखील पार्सलकरिता सध्या फुल्ल आहेत.

  – मिलिंद हिरवे,
                                 वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग

Back to top button