बारामती : विषारी ताडी पिल्याने माळेगावात दोघा युवकांचा मृत्यू

बारामती : विषारी ताडी पिल्याने माळेगावात दोघा युवकांचा मृत्यू

बारामती; पुढारी वृत्तसेवा: विषारी ताडी प्राशन केल्याने दोघा युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे घडली आहे. राजू लक्ष्मण गायकवाड (वय ३५) व हनुमंता मारुती गायकवाड (वय ४०) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. यासंबंधी माळेगाव पोलिस ठाण्यात अद्याप कसलीही नोंद झालेली नाही. परंतु या दोघांचेही मृत्यू ताडीमुळेच झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

शनिवारी (दि. २९) रोजी मृत दोघांसह अन्य तिघांनी मोठ्या प्रमाणावर ताडी प्राशन केली होती. त्यात राजू व हनुमंता या दोघांना कमालीचा त्रास होवून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर ताडी पिणा-या भय्यू चिनाप्पा गायकवाड, सनी चिनाप्पा गायकवाड व भीमा कलप्पा गायकवाड या तिघांना मात्र कोणताही त्रास झालेला नाही.

परंतु खबरदारी म्हणून त्यांना वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. मयत राजू व हनुमंता यांच्या कुटुंबात मागे पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. गायकवाड परिवार येथील चंदननगर भागात राहतो. भटका समाज कष्टाची कामे करुन आपला उदरनिर्वाह करतो. या घटनेमुळे माळेगावात खळबळ उडाली आहे. विषारी, रसायनयुक्त ताडीचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.

डोर्लेवाडीतल्या तरुणाचाही अकाली मृत्यू
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील एका तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला. गेली अनेक वर्ष तो ताडी प्राशन करत होता. ताडीने त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला होता. त्यातून त्याचा अकाली मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news