पुणे : ‘ससून’मध्ये स्वतंत्र वॉर्डची तृतीयपंथीयांना प्रतीक्षाच! | पुढारी

पुणे : ‘ससून’मध्ये स्वतंत्र वॉर्डची तृतीयपंथीयांना प्रतीक्षाच!

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ससून सर्वोपचार रुग्णालयात तृतीयपंथीयांची वैद्यकीय तपासणी, तसेच उपचारांसाठी स्वतंत्र वॉर्ड असावा आणि एक खिडकी योजना असावी, अशी मागणी 15 जानेवारी रोजी करण्यात आली होती. मात्र, आश्वासन मिळूनही मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. मुंबईतील जे. जे. रुग्णालयांतर्गत असलेल्या जी. टी. रुग्णालयात वॉर्ड नंबर 13 हा तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्रपणे देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातही वेगाने पावले उचलली जावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्डबद्दल तत्कालीन अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांना 15 जानेवारी 2022 रोजी मागणीचे निवेदन देण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी लवकरच अशी सोय उपलब्ध करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासन अद्याप पूर्ण होऊ शकले नाही.

मुंबईतील जे. जे. रुग्णालयांतर्गत असलेल्या जी. टी. रुग्णालयात वॉर्ड नंबर 13 हा तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्रपणे देण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांना स्वतंत्र उपचार मिळणार आहेत. उपक्रम यशस्वी झाल्यास अन्य जिल्ह्यांतील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांतही स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्याबाबत हमीपत्र देऊनही तो सुरू करण्यात आलेला नाही. याबाबत अनेकदा पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजही सरकारी रुग्णालयात तृतीयपंथीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इतर राज्यांत सरकारी रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी वॉर्ड तयार झाला असून, पुण्यात कधी होणार हा प्रश्न पडला आहे.
                                                        – कादंबरी, तृतीयपंथी, सामाजिक कार्यकर्ती

Back to top button