पिंपरी : साडेपाच लाखांची गुजरात बर्फी जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई | पुढारी

पिंपरी : साडेपाच लाखांची गुजरात बर्फी जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दिवाळीच्या कालावधीत हिंजवडी येथे भेसळीच्या संशयावरुन सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीची गुजरात बर्फी जप्त करण्यात आली. तर, पिंपरी येथे खाद्यतेलाचे 40 ते 50 डबे जप्त करण्यात आले. नागरिकांनी मिठाई खरेदी करताना पुरेशी दक्षता घेण्याचे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.

गेल्या आठवडाभरात दिवाळीच्या कालावधीत एफडीएच्या वतीने पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या हिंजवडी परिसरात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये हिंजवडी येथे जवळपास साडेपाच लाख रुपयांची गुजरात बर्फी जप्त करण्यात आली. ही बर्फी खाद्यतेल आणि मिल्क पावडर यांचा वापर करुन बनविल्याचा संशय आहे.

प्रत्यक्षात बर्फी खव्यापासून बनविणे अपेक्षित आहे. पिंपरी बाजारपेठेत खाद्यतेलाच्या पॅकींगसाठी जुने तेलाचे डबे वापरण्यात येत होते. तसेच, या डब्यांमध्ये भरण्यात येणार्‍या खाद्यतेलात भेसळ झाल्याच्या संशयावरुन एफडीएच्या वतीने 40 ते 50 डबे खाद्यतेल जप्त करण्यात आले, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी दिली.

भेसळ कशी होते ?
मिठाईसाठी नकली खव्याचा वापर केला जातो. नकली खव्याचा वापर करून बनविलेली मिठाई जादा भावाने विकली जाते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. खाद्यतेलात भेसळ करताना त्यामध्ये स्वस्त खाद्यतेल मिसळले जाते.

मिठाई खरेदी करताना काय काळजी घ्याल?
ओळखीच्या मिठाई विक्रेत्याकडून मिठाई खरेदी करावी.
विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे.
बिलामध्ये ब्रॅण्ड, पॅकिंग तारीख आदी बाबी नमूद असाव्यात.
मिठाई किती दिवस वापरता येईल, याची खात्री करून घ्यावी.
मिठाई विक्रेत्यांसाठी निकष
मिठाई स्वच्छ वातावरणात तयार करायला हवी.
मिठाईसाठी जास्त जुना खवा वापरू नये.
स्वीट बर्फीचा (गुजरात बर्फी) वापर करू नये.
मिठाईत वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असावे.
ज्या भांड्यांमध्ये मिठाई बनविली जाते ती भांडी स्वच्छ धुतलेली असावीत.

दिवाळीच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड व हिंजवडी परिसरात खाद्यपदार्थांतील भेसळीसंदर्भात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. गुजरात बर्फी आणि खाद्यतेलातील भेसळ आदींबाबत ही कारवाई केली. नागरिकांनी मिठाई खरेदी करताना पुरेशी दक्षता घेणे गरजेचे आहे. मिठाईची गुणवत्ता तपासावी. तसेच, किती दिवस मिठाई वापरता येईल, याची खात्री करून घ्यावी.
                                                    – संजय नारागुडे, सहआयुक्त (अन्न), एफडीए.

Back to top button