

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे विमानतळावरून आता दररोज 200 पेक्षा अधिक उड्डाणे होणार आहेत. पुणे विमानतळावरून उड्डाणे वाढविण्याच्या विमानतळ प्रशासनाच्या प्रस्तावाला भारतीय हवाई दलाने (आयएएफ) नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरील गर्दी कमी होणार असून, प्रवाशांना तत्काळ विमाने उपलब्ध होणार आहेत.
पुणे विमानतळ हे भारतीय हवाई दलाचा मोठा तळ आहे. भारतीय लष्कराची आणि हवाई दलाची येथून मोठी कामे सुरू असतात. त्यामुळे भारतीय हवाई दलाने पुणे विमानतळावरून होणार्या नियमित फेर्यांना बंधन घातले होते. त्यानुसार पुणे विमानतळावरून पूर्वी दिवसाला फक्त 160 ते 170 च्या घरात विमानांची उड्डाणे विमानतळ प्रशासनाला करता येत होती.
मात्र, अलीकडच्या काळात पुणे विमानतळावरून ये-जा करणार्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत नियमित विमान उड्डाणे वाढविण्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव विमानतळ प्रशासनाने भारतीय हवाई दलाला दिला होता. त्याला नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यानुसार 30 ऑक्टोबर 2022 पासून येथील उड्डाणांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
या ठिकाणी आणखी उड्डाणे वाढणार
प्रस्तावाला मान्यता मिळाल्यामुळे पुणे विमानतळावरून दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, गोवा, इंदूर, पाटणा, नागपूर, कोईम्बतूर, तिरुपती, जबलपूर, जयपूर, कोची, चंडीगड, लखनौ, प्रयागराज, भुवनेश्वर, रांची, गुवाहाटी, अमृतसर, तिरुअनंतपुरम, भावनगर, नाशिक, रायपूर, मंगळुरू, विशाखापट्टणम यांसारख्या ठिकाणी आणखी उड्डाणे वाढविण्यात येणार आहेत, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
वर्षात वाढले 10 हजार प्रवासी
पुणे विमानतळावरून दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीचा भार पुणे विमानतळावर वाढत आहे. गेल्या वर्षी 14 ते 15 हजारांच्या घरात विमानतळावरून प्रवाशांची रोजची ये-जा होती. यंदाच्या वर्षी या प्रवासी संख्येत वाढ झाली असून, दिवसाला 23 ते 25 हजारांच्या घरात येथून रोज प्रवाशांची ये-जा होत आहे.