

पुणे, पुढारी वृत्तसेवा: बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी जमीन-खरेदी विक्री करणार्या एका व्यवसायिकाला विमानतळ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली. रामकृष्ण विश्वास भोंडवे (वय 38, रा. गणेश हौसिंग सोसायटी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याने गेल्या कही दिवसापुर्वी जमीन खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार केले होते. त्यातूनच स्वतःच्या सुरक्षेसाठी त्याने स्वतः जवळ दोन बेकायदा पिस्तूले बाळगली होती. ही पिस्तूले कोणाकडून खरेदी केली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर परिसरातील पोरवाल रस्त्यावर एक जण थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी सचिन जाधव आणि सचिन कदम यांना बातमीदारामार्फत मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून भोंडवेला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि सहा काडतुसे सापडली.
भोंडवे याने पिस्तुल कोठून आणले तसेच कशासाठी आणले, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र ढावरे, अविनाश शेवाळे, गणेश साळुंके, रुपेश पिसाळ, नाना कर्चे आदींनी ही कारवाई केली.