मावळात भात कापणीला आला वेग | पुढारी

मावळात भात कापणीला आला वेग

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : परतीचा पाऊस थांबताच मावळ तालुक्याच्या सर्व विभागात खरीप भात पिकाच्या कापणीस सुरुवात झाली आहे. एकाच वेळी संपूर्ण तालुक्यात भात कापणी सुरू झाल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अखेर घरातील माणसांचा कापणी करावी लागत आहे.

पावसामुळे पिकाचे नुकसान
पाऊस गेल्या आठवड्यापासून पूर्णपणे उघडला आहे. त्यामुळे खरीप भात पिकाची रखडलेली कापणी सुरू झाली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. कापणीसाठी तयार असलेल्या खरीप भात पिकाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. काही शेतकर्‍यांचे नुकसान झालेले आहे.

13,500 हेक्टरवर लागवड
गेल्या रविवार पासून पश्चिम पट्ट्यात भात कापणीला सुरूवात झाली आहे. मात्र, प्रत्येक गावात एकाच वेळी भात कापणी सुरू झाल्याने कापणीसाठी लागणार्‍या मजुराचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मावळ तालुक्यात सुमारे 13 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरीप भातपीक घेण्यात आलेले आहे. तर, सुमारे 200 गावांमध्ये पेरण्या झाल्या आहेत.

अनेक भात खचरांत पाणी
यावर्षी दिवाळीपूर्वी परतीच्या जोरदार पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे काही भात खाचरांमध्ये पाणी साठलेले आहे. अशा खाचरांतील भात कापणी करणे शेतकर्‍यांना अडचणीचे आणि खर्चाचे होणार आहे.

Back to top button