बारामतीत लवकरच ग्रा. पं. निवडणुकीची धूम; राष्ट्रवादीच्या दोन पॅनेलमध्ये होणार जोरदार टक्कर | पुढारी

बारामतीत लवकरच ग्रा. पं. निवडणुकीची धूम; राष्ट्रवादीच्या दोन पॅनेलमध्ये होणार जोरदार टक्कर

बारामती; पुढारी वृत्तसेवा: दिवाळीची धामधूम थांबली असली तरी लवकरच बारामती तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींची निवडणूक रणधुमाळी सुरू होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींसाठी इच्छुक असणार्‍यांनी दिवाळीचा मुहूर्त साधत जनतेला खुश करण्यासाठी गिफ्ट वाटप जोरात केले. डिसेंबर 2021 ते 2022 मधील मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींची निवडणूक 20 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत पार पडणार आहे. ग्रामपंचायतींचे प्रभाग क्रमांक आणि पूर्वी जाहीर झालेले आरक्षण पुढे लागू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्याच दोन पॅनेलमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळते. ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखण्यासाठी दोन्हीही गटाकडून प्रचंड ताकद लावली जाते.

विकासकामांवर मात्र कोणीही बोलायला तयार होत नाही, अशी स्थिती आहे. जळगाव कडेपठार, भिलारवाडी, वाघळवाडी, वाणेवाडी, मुरुम, गडदरवाडी, सोरटेवाडी, पणदरे, कुरणेवाडी, सोनकसवाडी, मोरगाव, लोणी भापकर, मासाळवाडी, पळशी आणि कार्‍हाटी या ग्रामपंचायतींची निवडणूक नोव्हेंबरमध्ये पार पडणार आहे. ग्रा.पं. निवडणुकीमुळे इच्छुकांनी मतदारराजाला साकडे घालायला सुरुवात केली आहे. चौकाचौकात ग्रामपंचायत निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

ग्रामपंचायतीची थकित घरपट्टी व पाणीपट्टी भरून अनेक तरुण उमेदवारांनी निवडणूक लढण्याची तारी केली आहे. अनेक तरुण इच्छुक असल्याने ते ज्येष्ठांचा मान राखतात का त्यांना विरोध करून उमेदवारी अर्ज भरतात हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये चुका आढळून आल्या आहेत. तर नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत. स्थानिक ठेकेदारांना गावातील कामे दिल्याने विकासकामांचा दर्जा राखला गेला नसल्याचे मागील पाच वर्षात झालेल्या कामावरून स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत याचा जाब जनता विचारण्याची चिन्हे असल्याने अनेकांच्या नाकी दम येणार आहे.

Back to top button