नारायणगाव : विघ्नहर करणार कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप | पुढारी

नारायणगाव : विघ्नहर करणार कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा: श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीतील सुमारे 25 हजार एकर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. कारखान्याच्या हद्दीतील संपूर्ण उसाचे गाळप करण्यात येईल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी व्यक्त केला. जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सखल भागात उसाच्या फडात पाणी साठल्याने उसाची तोड करण्यास अडचणी येत आहेत. कारखान्याद्वारे सदर भागातील ऊस काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.

विघ्नहर कारखाना कार्यक्षेत्रात तब्बल 225 ऊस तोडणी करणार्‍या टोळ्या दाखल झाल्या आहेत. या टोळ्यांबरोबर आलेल्या बैलांपैकी तीन बैलांमध्ये लंपी आजाराची लक्षणे आढळून आली. त्यातील एक बैल दगावला असून दोन बैलांवर उपचार करण्यात आले. इतर सर्व बैलांचे लसीकरण करण्यात आले.

साखरेला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिला आहे. त्यानुसार श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना दरदिवशी 30 हजार किलो लिटर (केएलपीडी) इथेनॉल निर्मिती करीत आहे. कारखाना 65 हजार किलो लिटर इथेनॉल निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठीचे काम प्रगतीपथावर आहे.

                                           सत्यशील शेरकर, अध्यक्ष, विघ्नहर साखर कारखाना

 

Back to top button