राजगुरूनगर शहर झाले कचरामय; नगरपरिषदेचे दुर्लक्ष, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण | पुढारी

राजगुरूनगर शहर झाले कचरामय; नगरपरिषदेचे दुर्लक्ष, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा: राजगुरुनगरनगर नगरपरिषदे लगत असलेल्या दैनंदिन बाजार आवारात रोज कचर्‍याचे ढीग पडून राहत आहेत. दिवसभर या कचर्‍यात मोकाट जनावरे फिरत असल्याने हा कचरा सर्व परिसरात विखुरला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या या परिसरात नागरिक कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत. नगरपरिषदेचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. अशीच स्थिती राजगुरुनगर शहरातील प्रत्येक रस्त्यावर आहे.

शहरातील प्रत्येक रस्ता ज्या ठिकाणी शहराच्या बाहेर संपतो किंवा रहदारी बाहेर सुरू होतो त्या मोकळ्या जागेत ठिकाणी रात्री अपरात्री नागरिक कचरा फेकून देत असल्याने सर्व शहर कचरामय झाले आहे. ऐन दिवाळीच्या , सणासुदीच्या काळात शहरात असा कचरा असल्याने नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. या कचर्‍यापासून जाताना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. राजगुरुनगर नगर परिषदेने याबाबीकडे दुर्लक्ष केले आहे. सुट्टीच्या काळात कामगारांची वाणवा असल्यामुळे असे घडत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, नगरपरिषदेला कचर्‍याचे व्यवस्थापन करता येत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

विविध ठिकाणी काही दिवस कचरा पडून राहत असल्याने त्या ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे. त्या दुर्गंधीमुळे डास, माशा यांचा वावर वाढला असून अशा माशांच्या व डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना साथीचे आजार जडत आहेत. थंडी,ताप, घसा, डोके दुखणे, मळमळ अशा प्रकारच्या आजारांनी नागरिक त्रासले आहेत. रुग्णांनी शहरातील दवाखाने भरून गेले आहेत. स्थानिक प्रशासन म्हणून नगरपरिषद किंवा महसूल विभागाचे कोणतेही अधिकारी कर्मचारी या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळेच कचर्‍याची समस्या उग्र रुप धारण करु लागली आहे. राजगुरुनगर शहर हे तालुक्याचे गाव आहे. परंतु, अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Back to top button