शिक्रापूर : वरिष्ठांसाठी पॅकेज मागणार्‍या हवालदारावर गुन्हा | पुढारी

शिक्रापूर : वरिष्ठांसाठी पॅकेज मागणार्‍या हवालदारावर गुन्हा

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: दाखल केलेल्या अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल करतो, याकरिता स्वतःसाठी मोबाईल व वरिष्ठ अधिकार्‍यासाठी पॅकेजची मागणी करणार्‍या शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. चमन शेख असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघाळे (ता. शिरूर) येथील एकाने तक्रार अर्ज दाखल केला होता. चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी हवालदाराने मोबाईल व उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी एक लाख रुपयांचे पॅकेज द्यावे लागेल, असे सांगितले. यानंतर सदर इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. या विभागाने शासकीय पंचासह रेकॉर्डर लावून चमन शेखची भेट घेतली.

शेख याने गुन्ह्याची प्रक्रिया सांगत सदर लाचेची मागणी केली. हे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले. चमन शेखला संशय आल्याने त्याने तक्रारदाराला व्हॉटसअ‍ॅप कॉल करून संशय व्यक्त केला. तेव्हापासून त्याने फोन बंद केला व पोलिस ठाण्यात येणे बंद केले. अखेर गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केल्याने शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button