बावडा : यंदा सर्वत्र दीपावली जोशात! बाजार-पेठांमध्ये विक्रमी उलाढाल | पुढारी

बावडा : यंदा सर्वत्र दीपावली जोशात! बाजार-पेठांमध्ये विक्रमी उलाढाल

राजेंद्र कवडे-देशमुख
बावडा : यंदाची दिवाळी कशी जाणार? बहुतेक जेमतेमच जाईल, असा प्रारंभी सर्वांचाच अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात सर्वांचे अंदाज चुकवीत दिवाळी सण जल्लोषात, उत्साही व आनंदी वातावरणात साजरा झाला. दिवाळीमध्ये एकाही क्षेत्रामध्ये आर्थिक मंदी दिसून आली नाही. परिणामी, यंदा समाजातील सर्वच घटकांची दीपावली जोशात झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीमुळे दोन वर्षे नागरिकांची दिवाळी जेमतेम झाली होती. या निराशजनक अनुभवाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळी उत्सवावर कोरोनाचा मागमूसही दिसत नव्हता. दोन वर्षांनंतर संधी चालून आल्याने चालू वर्षाची दिवाळी अतिशय जोशात व उत्साहात नागरिकांनी साजरी केली. दिवाळी साजरी करायला खर्च किती येतो? त्यामुळे नागरिकांना दीपावली साजरी करण्यासाठी आर्थिक अडचण जाणवली नाही व नागरिकांनी दिवाळी खरेदीसाठी हात आखडता घेतला नाही.

चालू वर्षी फटाक्यांची विक्री विक्रमी झाल्याचे फटाका विक्रेत्यांनी आश्चर्यचकित होऊन सांगितले. दिवाळीनिमित्त कर्मचार्‍यांना बोनस, साखर कारखान्यांनी दिवाळीसाठी दिलेले ऊसबिलाचे हप्ते, राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांमधून उपलब्ध केलेले धान्य व ‘आनंद शिधा’ तसेच शेतकर्‍यांच्या मक्याला असलेला चांगला भाव आदीमुळे दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यास सर्वसामान्य नागरिकांना, शेतकर्‍यांना व शेतमजुरांना अडचण आली नाही. दिवाळी म्हटली की नवीन कपडे व घरी गोडधोड पदार्थ, फटाके आलेच. त्यामुळे कापड दुकाने, किराणा दुकाने, फटाके स्टॉल गर्दीने फुलून गेले होते.

Back to top button