पुणे : खंडणी दे, अन्यथा जिवे मारू | पुढारी

पुणे : खंडणी दे, अन्यथा जिवे मारू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बातमी प्रसिद्ध करून बदनामी करण्याची तसेच खुनाची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी महिलेसह सहा तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चौघांना मुंढवा पोलिसांनी मंगळवारी (दि.25) रात्री अटक केली. प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे आणि लक्ष्मणसिंग तंवर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. योगेश नागपुरे आणि संजीवनी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 23 ऑक्टोबर रोजी केशवनगरमधील दत्त कॉलनीमधील एका गोदामात घडला. याप्रकरणी 42 वर्षांच्या व्यावसायिकाने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीचे केशवनगर येथील दत्त कॉलनीत गोदाम आहे. आरोपी प्रमोद साळुंके, वाजीद सय्यद 23 ऑक्टोबर रोजी त्यांच्या गोदामात गेले. गोदामाच्या बाहेर मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंग तंवर थांबले होते. प्रमोद साळुंखेने फिर्यादीला पत्रकार असल्याचे सांगितले. ‘तुमच्या गोदामामध्ये भेसळयुक्त अन्नधान्याचा साठा आहे. यापूर्वी गुटख्याची विक्री करून खूप पैसा कमावला आहे. बातमी प्रसिद्ध करून तुमची बदनामी करतो. जर पैसे दिले नाही तर जिवे मारून टाकतो’, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या मुलाला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चौघा तोतया पत्रकारांना अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक काकडे, सहायक पोलिस निरीक्षक करपे, नाना भांदुर्गे आदींनी ही कारवाई केली.

Back to top button