पुणे : भाजपला अंदाज येत नसल्याने निवडणुका लांबणीवर: अजित पवार यांची टीका | पुढारी

पुणे : भाजपला अंदाज येत नसल्याने निवडणुका लांबणीवर: अजित पवार यांची टीका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘राज्यातील महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळेल की नाही, याचा अंदाज भाजपला येत नाही, त्यामुळे निवडणुका लांबणीवर जात आहेत. त्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. यश मिळण्याचा अंदाज येईल तेव्हा निवडणुका होतील,’ अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी (दि. 28) पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर मते व्यक्त केली. सत्ताधारी भाजपला महापालिका निवडणुकीत विजय मिळण्याचा अंदाज येत नसल्याने निवडणुका लांबत असल्याची टीका या वेळी पवार यांनी केली.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केल्या गेलेल्या 23 गावांना पुन्हा राजकीय हेतूने वगळण्याचा घाट शिंदे सरकार घालत असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘ही गावे महापालिकाहद्दीत समाविष्ट करावी, ही राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्यापासून भूमिका राहिली आहे. ती आजही असून, यापूर्वी आम्ही सत्तेत असताना घेतलेले निर्णय बदलण्याचे काम सध्याचे सरकार करीत आहे. आमचा गावे वगळण्यास विरोध आहे.’

‘सत्ता द्या, 40 टक्के सवलतीचा प्रश्न सोडवतो’
पुणे महापालिका क्षेत्रातील निवासी मिळकतींना मिळकत करात चाळीस टक्के सवलत दिली जात होती. ही सवलत लोकलेखा समितीच्या आक्षेपानंतर राज्य सरकारने रद्द केली. यामुळे सध्या पुण्यातील मिळकतदारांना वाढीव दराने मिळकत कर भरावा लागत आहे. या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, ‘आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्ता द्या, मिळकत कराच्या 40 टक्के सवलतीचा प्रश्न एका मिनिटात सोडवतो.’

Back to top button