मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा दौरा नमस्कारासाठी, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत पोहचली: चंद्रकांत पाटील | पुढारी

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा दौरा नमस्कारासाठी, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत पोहचली: चंद्रकांत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पंचनामे होण्यासाठी आणि नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा लागतो. आता पंचनामे झाले आहेत, एनडीआरएफच्या नियमाच्या दुप्पट मदत केली आहे. आता शेतकरी, नागरिकांना भेटण्यासाठी आणि नमस्कार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रीत दौरा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पाहणी दौर्‍याला उशीर झाला, असे म्हणता येणार नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे उच्च व तंत्र मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुण्यातील एका कार्यक्रमाला पाटील यांनी शनिवारी हजेरी लावली. यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले, विविध प्रकारच्या आपत्तींचे पंचनामे करण्याचे आदेश जून महिन्यातच दिले गेले आहेत. त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत, नुकसानग्रस्तांना मदतही मिळाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे यापूर्वी दौरे केले आहेत. आता ते शेतकरी, नागरिकांना भेटण्यासाठी आणि नमस्कार करण्यासाठी एकत्रीत दौरा करणार आहेत.

राज्य सरकार उत्तम प्रकारे कारभार करत आहेत. सरकारमध्ये कोणीही नाराज नाही. मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. ते वेळ येईल तेव्हा विस्तार करतील, असेही पाटील म्हणाले. नागपूर येथील एअर बसचा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, याबाबत मला काहीही माहिती नाही, माहिती घेवून या विषयावर पुन्हा बोलेन. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून केल्या जाणार्‍या आंदोलनात नागरिकांचा सहभाग नाही. त्यांचेच कार्यकर्ते एकमेकांच्या दौर्‍यांना आणि आंदोलनांना हजेरी लावतात. आगामी 2024 च्या निवडणुकीपर्यंत एकत्र राहण्यासाठी महाविकास आघाडीला मेहनत घ्यावी लागेल, असेही पाटील म्हणाले.

शिक्षकांच्या आंदोलनाचा काहीच फायदा नाही 
शिक्षक भरतीसाठी शिक्षकांचे आंदोलन सुरू असल्याचा पार्श्वभूमीवर बोलताना पाटील म्हणाले, शिक्षकांच्या 2088 जागा भरण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांनी आंदोलन करण्याचे कारण नाही. भरती करताना संस्थेचे रोस्टर पहावे लागणार आहे. संस्था चालकांनी पावणे रावळ्यांची भरती केली आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने जातींच्या आरक्षणाची आंमलबजावणी झालेली नाही. ज्यांचे रोस्टर योग्य आहे, त्यांना परवानगी मिळणार आहे, त्यामुळे शिक्षकांच्या आंदोलनाचा काहीही फायदा होणार नाही, असेही पाटील म्हणाले.

ठाकरेंना उशीरा साक्षात्कार झाला 
सेनेचे प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी दौरे करून सरकारमधील मंत्री फिरत नाहीत, नुकसानग्रस्तांना मदत मिळत नाही, असा आरोप करत “देता का जाता” असा सवाल केला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पाटील म्हणाले, मातोश्रीमध्ये बसुन नागरिकांचे दुःख कळताना, असा त्यांचा समज होता. मात्र, त्यांना उशीरा का होईला साक्षात्कार झाला आहे. ते दौरे करत आहेत. हे करत असताना ते काही मागण्या करत आहेत. मात्र, आपण सत्तेत असताना का केले नाही, याची आठवण ठेवणे गरजेचे असल्याचेही पाटील म्हणाले.

Back to top button