

पेठ; पुढारी वृत्तसेवा: सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागामध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे बटाट्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. याबाबत शेतावर येऊन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी करून शेतकर्यांशी चर्चा केली. या प्रसंगी प्रदीप वळसे पाटील, नीलेश थोरात उपस्थित होते. लवकरच शेतकर्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न शासनदरबारी करून नुकसानभरपाई मिळवून देण्यास प्राधान्यक्रम दिला, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी वळसे पाटील यांनी सातगाव पठार भागातील नुकसानीची पाहणी केली. अनेक शेतकर्यांचे बटाटे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे आर्थिक गणित हे बटाटा पिकावर अवलंबून असते, पण ढगफुटीने बटाटा पिकाचे नुकसान झाले.
सातगाव पठार भागातील पेठ, कुरवंडी, कारेगाव, थूगाव, भावडी, कोल्हारवाडी, पारगाव आधी संपूर्ण सातगाव पठार भागात ढगफुटीसदृश पावसाचा तडाका बसला आहे. अनेक रस्त्यांना ओढ्या- नाल्यांचे स्वरूप आले होते. अनेक शेतांचे पाण्याच्या तलावामध्ये रूपांतर झाले होते.
पावसाने अनेक बटाट्याच्या आरणीमध्ये पाणी घुसले आणि बटाट्याचे नुकसान झाले, तरी शेतकर्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटामध्ये शेतकर्याला मदत करण्याचे काम राज्य शासनाने तातडीने करावे, अशी मागणी सरपंच संतोष धुमाळ, मंगेश पवळे, ग्रामपंचायत सदस्य संजय पवळे, विकास बारवे, रमेश सावंत, मनोहर भोजने, प्रमोद धुमाळ यांसह सातगाव पठार भागातील शेतकर्यांनी केली आहे.