सांगवी : मशिनवर तीन अंगठे दिल्याशिवाय मिळेना रेशनचे धान्य | पुढारी

सांगवी : मशिनवर तीन अंगठे दिल्याशिवाय मिळेना रेशनचे धान्य

अनिल तावरे
सांगवी : महाराष्ट्रातील जनतेची दिवाळी गोड व्हावी म्हणून राज्य सरकारने नेत्यांचे फोटो छापून मोठ्या दिमाखात 100 रुपयांत आनंद किटचे वाटप केले. मात्र दिवाळीनंतर आनंद किटच्या योजनेसह नियमित पैसे भरून मिळणारे व मोफत मिळणार्‍या योजनेचे धान्य मिळण्यासाठी तीन अंगठे दिल्याशिवाय काहीच मिळणार नसल्याची सक्ती केली आहे.

बारामती तालुक्यातील सांगवी येथे शासनाच्या वितरण प्रणालीचा सर्व्हर डाऊन असल्याने एका लाभार्थ्याला तीन अंगठे देण्यासाठी किमान वीस मिनिटे लागतात. अनेक लाभार्थ्यांना दिवस दिवस उभं राहूनदेखील धान्य मिळत नसल्याने शासनाच्या भोंगळ कारभारामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ आली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया लाभार्थ्यांमधून होत आहेत.

सांगवी येथे 1 हजार 292 रेशन कार्डधारक संख्या आहे. या लाभार्थ्यांना दिवाळीचा सण गोड व्हावा म्हणून 100 रुपयांमध्ये एक तेल पुडा, रवा, चणाडाळ, साखर आदी वस्तू आनंद किट योजनेच्या माध्यमातून वाटण्यात आल्या. हे किट मुळात तालुका स्तरावर उशिरा उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे मशिनवर अंगठा न घेता फक्त कच्च्या नोंदी घेऊन किटचे वाटप करण्यात आले होते.

दोन दिवसांपूर्वी नियमित पैसे भरून मिळणारे धान्य व गेल्या तीन वर्षांपासून मिळणारे मोफत धान्य स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या तीनही योजनांचे धान्य एकाच वेळी घेण्यासाठी शासनाने सक्ती केली असल्याचे रेशन दुकानदार सविता वाबळे यांनी सांगितले.

संपूर्ण राज्यात धान्य वितरण सुरू असल्याने संबंधित पॉज मशिनचा सर्व्हर डाऊन असल्याने एका लाभार्थ्याला तीन अंगठे देण्यासाठी किमान वीस मिनिटे लागतात. त्यातूनही वयस्कर व्यक्तींचे अंगठे मशिनवर लवकर उठत नसल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. गेले दोन दिवस असा प्रकार सुरू असताना एकही राजकीय नेता फिरकताना दिसत नाही. काही लाभार्थ्यांना रोजगार बुडवून दिवस दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे.

काही लाभार्थ्यांना नंबर जाईल म्हणून दिवसभर न जेवता उपाशीपोटी उभे राहावं लागत आहे. शासनाच्या या अजब कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शासनाने जशी आमची दिवाळी गोड केली तशाच प्रकारे एकच अंगठा घेऊन आम्हाला तीनही योजनांचे धान्य एकाच वेळी देण्याची मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.

सर्वत्र ही समस्या निर्माण झाली असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
                                                                -विजय पाटील, तहसीलदार, बारामती

Back to top button