पुणे : मेट्रोचे मार्गक्रमण महिनाभरात वाढणार; भुयारी मेट्रोचा फील डिसेंबरमध्ये | पुढारी

पुणे : मेट्रोचे मार्गक्रमण महिनाभरात वाढणार; भुयारी मेट्रोचा फील डिसेंबरमध्ये

ज्ञानेश्वर बिजले
पुणे : मेट्रो मार्गाच्या पुढील काही भागांची चाचणी येत्या पंधरवड्यात होणार आहे. तेथे महिनाभरात मेट्रो प्रवाशांच्या सेवेला उपलब्ध होईल. पुणेकरांना भुयारी मेट्रोचा फील डिसेंबरमध्ये घेता येईल, तर कोथरूडमधून शहराच्या मध्यवस्तीत पोहचता येणार आहे. कृषी महाविद्यालय ते स्वारगेट यादरम्यानच्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. शिवाजीनगर आणि न्यायालय येथील भुयारी स्थानकांची कामे जवळपास संपली आहेत.

कृषी महाविद्यालयालगतच्या डेपोपासून शिवाजीनगर व न्यायालय या दोन स्थानकांत मेट्रो धावण्याची चाचणी येत्या पंधरवड्यात घेण्यात येईल. चाचणी यशस्वी ठरल्यास या मार्गाला परवानगी मिळून डिसेंबरमध्ये या भुयारी मार्गातून मेट्रो धाऊ शकेल. पुण्यात भुयारी मार्गातील मेट्रो प्रवासाचा फील त्या वेळी पुणेकरांना अनुभवण्यास मिळेल.

पिंपरीतून थेट पुण्यात
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये महापालिका भवनापासून फुगेवाडीपर्यंत सात किलोमीटर अंतरात मेट्रो धावत आहे. ती मेट्रो आणखी पाच किलोमीटर धावून न्यायालयापर्यंत पोहचेल. पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या 17.4 किलोमीटर अंतरापैकी सुमारे 12 किलोमीटर अंतर मेट्रो डिसेंबरपर्यंत पार करेल. दोन्ही मार्गांवर सुमारे वीस किलोमीटर अंतराचा प्रवास मेट्रो डिसेंबरपर्यंत सुरू करेल.

खडकीमध्ये दोन गर्डर लाँचर उभे करून व्हायाडक्ट लवकर पूर्ण करण्याला प्राधान्य देत आहोत. नोव्हेंबरमध्ये भुयारी मार्गातील न्यायालयापर्यंतच्या मार्गाची चाचणी तसेच गरवारे महाविद्यालय ते न्यायालय या मार्गाची चाचणी घेण्यात येईल. त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्यासंदर्भात राज्य सरकारला कळविण्यात येईल. या मार्गांचे उद्घाटन कधी करावयाचे, त्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाईल.

                                                  – हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

खडकीतील व्हायाडक्टला प्राधान्य
संरक्षण विभागाकडून पुणे-मुंबई रस्त्यावरील खडकी येथील जागा मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे खडकीतील काम पूर्ण करण्यास उशीर होत आहे. महामेट्रोने या भागातील व्हायाडक्ट पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. तेथील काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना पिंपरी-चिंचवड महापालिका भवनापासून न्यायालयापर्यंत प्रवाशांना मेट्रोतून ये-जा करता येईल.

मेट्रो प्रवासाचा दुसरा टप्पा लवकरच
मेट्रो प्रवासाचा दुसरा टप्पा लवकर सुरू होत असून, गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय, या दोन मार्गांवर मेट्रोचा विस्तार होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्चमध्ये पुण्यातील मेट्रोचे उद्घाटन झाले. तेव्हापासून पिंपरी-चिंचवड महापालिका भवनापासून फुगेवाडीपर्यंत, वनाजपासून गरवारे महाविद्यालय या मार्गावर मेट्रो धावत आहे.

वनाजपासून गरवारे महाविद्यालय हे अंतर पाच किलोमीटर असून, तेथून पुढे न्यायालयापर्यंतच्या आणखी तीन किलोमीटर अंतराचा प्रवास मेट्रो सुरू करील. त्यामुळे वनाजपासून आठ किलोमीटर अंतरापर्यंत न्यायालयापर्यंत मेट्रो पोहचेल. डेक्कन जिमखाना व संभाजी उद्यान येथील स्थानक उभारणीला मात्र विलंब होत आहे. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग असून, न्यायालय ते रामवाडी या सात किलोमीटर अंतराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गावर मेट्रो मार्चमध्ये धावणार आहे.

Back to top button