पुणे : सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले | पुढारी

पुणे : सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दिवाळीच्या आदल्या दिवशीपर्यंत कोसळणारा मुसळधार पाऊस, ऐन दिवाळीत वाढलेली थंडी, फटाक्यांमुळे झालेले प्रदूषण, फराळाच्या पदार्थांवर मारलेला ताव… अशा विविध कारणांमुळे अनेकांना सर्दी, खोकला, घसा दुखणे, कानात दडे बसणे, असा त्रास सुरू झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते. चिवडा, चकली, शंकरपाळया, करंज्या असे तळणीचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. तेलकट, तूपकट पदार्थांमुळे पित्त, खोकला, घसादुखी असा त्रास उदभवू लागला आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे ताप, सर्दीचे रुग्णही वाढले आहेत.

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवाळी साजरी करण्यावर काहीशी बंधने आली होती. त्यामुळे यंदा बहुतांश जणांनी धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली. त्यामुळे फटाकेही मोठ्या प्रमाणात वाजवले गेले. फटाक्यांच्या धुरामुळे आणि आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, अस्थमाचे रुग्ण, उच्च रक्तदाबाचे रुग्ण यांना जास्त त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

औषधांची मोठ्या प्रमाणात विचारणा
दिवाळीनंतर एक-दोन दिवस काही छोटे दवाखाने बंद असल्याने नागरिकांनी तात्पुरता उपाय म्हणून मेडिकल स्टोअरमधून सर्दी, खोकला, कानदुखी, डोळे चुरचुरणे अशा त्रासांवर औषधांसाठी विचारणा केल्याचे दिसून आले. काहींनी घरी उपलब्ध असलेल्या औषधांच्या डोसवर समाधान मानले.

गेल्या दोन दिवसांमध्ये कान, नाक, घशाशी संबंधित समस्या असणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्दी, खोकला झालेल्यांमध्येही वाढ झाली आहे. वायू आणि ध्वनिप्रदूषण, बदलेले वातावरण यांचा परिणाम आरोग्यावर होताना पाहायला मिळत आहे. रुग्णांमध्ये लहान मुले आणि वृध्दांचे प्रमाण जास्त आहे.

                                                         – डॉ. अभिजित पाटील, जनरल फिजिशियन

Back to top button