जनतेला 100 रुपयात किराणा देण्याचे नुसते गाजरच ! : विरोधी पक्षनेते अजित पवार | पुढारी

जनतेला 100 रुपयात किराणा देण्याचे नुसते गाजरच ! : विरोधी पक्षनेते अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण खरीपाचा हंगाम वाया गेला आहे तरीही सरकार काहीच हालचाल करताना दिसून येत नाही. मी स्वत: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. पुणे येथे पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शासनाचे शेतकऱ्याकडे पुरेसे लक्ष नसल्याची टीका केली. ते पुढे म्हणाले, ‘राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे अनेकांच्या घरी दिवाळीही साजरी झाली नाही. पण सरकार मात्र यावर अजून काहीच निर्णय घेताना दिसत नाही.’ या शब्दात त्यांनी शासनावर टीका केली.

यासोबत सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या बेजबाबदार विधानाचाही त्यांनी खरमरीत शब्दांत समाचार घेतला. सत्ताधारी पक्षातील अर्ध्याहून नेते काय बोलतात, काय करतात, ते काहीच कळत नाही. त्यांचेच आमदार एकमेकांवर खोक्याचा आरोप करत आहेत. मंत्री जिल्हाधिकाऱ्यांना म्हणतात, तुम्ही दारू पिता का ? त्यांच्यात नक्की काय सुरू आहे कळत नाही. किराणाबाबतही जनतेची अशीच फसवणूक केली गेली आहे. कुठं तेल गेलं कळलंच नाही, आनंदाचा शिरा लोकांपर्यंत पोहचलाच नाही. कुठे तेल पोहचलं तर रवा नाही, रवा पोहचला‌तर साखर नाही. त्यातही दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत असते असे म्हणून मंत्री नागरिकांची थट्टा करत आहेत. याप्रकरणी मंत्री व आमदारांना योग्य ती समज देणं अत्यंत गरजेचं आहे.

Back to top button