पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढले 36 हजार मतदार

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढले 36 हजार मतदार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरात मतदारांची संख्याही वाढत आहे. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदार संघात तसेच, भोर मतदार संघातील ताथवडे भाग असे एकूण 15 लाख 20 हजार 880 मतदार आहेत. तर, चिंचवड मतदार संघ राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा मतदार संघ आहे. एकूण 36 हजार 622 मतदार वाढले आहेत. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांना येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 23 जानेवारीला महाराष्ट्र राज्यातील विधानसभानिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात पिंपरी मतदार संघात 3 लाख 64 हजार 806 मतदार आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघात सर्वांधिक 5 लाख 95 हजार 408 मतदार आहेत. तर, भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण 5 लाख 35 हजार 666 मतदार आहेत. शहरात एकूण 8 लाख 2 हजार 160 पुरूष, 6 लाख 93 हजार 559 महिला आणि 161 तृतीयपंथी मतदार आहेत. पुरूषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या एक लाख 9 हजारांने कमी आहे.
या मतदार यादीतून दुबार नावे, मयताचे नावे, समान छायाचित्र असलेली नावे, स्थलांतरीत मतदार यांची नावे वगळण्यात आली आहेत. घरोघर केलेली जनजागृती, हाऊसिंग सोसायट्या व महाविद्यालयात विशेष मोहिमा घेण्यात आल्या. त्यामुळे यंदा 18 ते 20 या वयोगटातील नवमतदारांची संख्या वाढली आहे. चिंचवड मतदार संघात 5 हजार 63 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. एकूण 21 हजार 716 जणांनी नोंदणी झाली आहे. तर, भोसरी मतदार संघात 8 हजार 808 मतदारांची संख्या वाढली आहे. त्यात 2 हजार 519 हे 18 ते 19 वयोगटातील नवमतदार आहेत. तर, पिंपरी मतदार संघात एकूण 6 हजार मतदारांची नोंदणी वाढली आहे.

15 लाखांपेक्षा अधिक मतदार
पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या 14 लाख 95 हजार 880 इतकी आहे. भोर विधानसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे गावाचा भाग समावेश आहे. तेथे सुमारे 25 हजार मतदार संख्या आहे. ती मतदार संख्या धरल्यास पिंपरी-चिंचवड शहराची एकूण मतदार संख्या 15 लाख 20 हजार 880 इतकी होते.

चिंचवडमध्ये सर्वांधिक मतदान केंद्र
चिंचवड विधानसभा मतदार संघ हा राज्यातील सर्वांत मोठा दुसर्‍या क्रमाकांचा मतदार संघ आहे. या मतदार संघात पुणे जिल्ह्यातील 21 मतदार संघात सर्वांधिक 5 लाख 95 हजार 408 मतदार आहेत. तर, मतदान केंद्र 510 आहेत. तर, भोसरी मतदार संघात एकूण 464 मतदार केंद्र आहेत. पिंपरी मतदार संघात एकूण 399 केंद्र आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news